एजन्सी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी समृद्धी महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारी एक खासगी बस संरक्षक भिंतीला (पॅरापेट वॉल) धडकून उलटल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आणि 27 जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात होऊन दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर तब्बल ३० प्रवासी जखमी झाले आहेत. वाशिम येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या या बसला छत्रपती संभाजीनगर शहराजवळील नायगाव (सावंगी) शिवारात पहाटेच्या सुमारास अपघात झाला. चालकाचा डोळा लागल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पुलाच्या कठड्याला जोरदार धडकून उलटली. या दुर्घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली.

माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्सची ही बस वाशिम येथून मुंबईच्या दिशेने प्रवाशांना घेऊन निघाली होती. प्रवास सुरू असताना पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरजवळील नायगाव (सावंगी) शिवारात चालकाचा डोळा लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव बस महामार्गावरील पुलाच्या कठड्याला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की, बस रस्त्यावर उलटली. या अपघातात बसमधील प्रवाशांना मोठा फटका बसला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य करण्यात आले. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर सुमारे ३० प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकांच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळणे बाकी आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळी लांब पल्ल्याचा प्रवास करताना चालकांना पुरेशी विश्रांती मिळणे आणि वाहन चालवताना झोप येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनकडून करण्यात आले आहे.