जेएनएन, मुंबई. Sanjay Raut Health Update: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अन्य महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचं बिगुल येत्या काही दिवसात वाजण्याची शक्यता असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ असा लौकिक असलेले ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे पुढचे दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. स्वत: संजय राऊत यांनी पत्र लिहून याबाबतची माहिती दिली असून, त्यामागचं चिंताजनक कारणही सांगितलं आहे.
पक्षफुटीपासून पक्षचिन्ह व पक्षाचे नाव गमावलेल्या ठाकरे गटाला गेल्या दोन तीन वर्षांपासून अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मुंबई महापालिकेत सत्ता राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असताना त्यांचा एक शिलेदार बाजुला झाला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी सांगितले आहे की, त्यांच्या प्रकृतीत गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन महिने ते सार्वजनिक जीवनात वावरू शकणार नाहीत. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या. मात्र आज एक पत्रक प्रसिद्ध करुन राऊत यांनी आपल्या आजाराबद्दल कार्यकर्त्यांना माहिती दिली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांना भाजपला भंडावून सोडले होते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता.
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2025
Sanjay Raut: संजय राऊत यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती
जय महाराष्ट्र !
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.
कळावे.
दरम्यान, संजय राऊत यांनी या पत्रकामधून त्यांना कोणता आजार झाला आहे, त्याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला नाही. मात्र राऊत यांचे आजारपण ठाकरे गटाला मोठा धक्का असून शिवसैनिकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
