मुंबई. महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे वाहनांवर आकारण्यात आलेला दंड आणि प्रलंबित ई-चलन वसुलीच्या प्रश्नावर सरकारने अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले वाहतूक दंड भरण्याची चिंता असलेल्या वाहनचालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने अनेक शहरांमध्ये वाहतुकीवरही ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नो एन्ट्री, सिग्नल तोडणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे तसेच अन्य वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. अनेक वाहनचालकांच्या वाहनांवर ई-चलनच्या माध्यमातून दंड आकारला जातो. मात्र, हा दंड वेळेत न भरल्याने अनेकांची चलने प्रलंबित राहतात.
मात्र, आता अशा वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलन अभय योजना-2026 लागू करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रलंबित वाहतूक दंडाच्या रकमेवर एकरकमी भरपाई केल्यास 20 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच, वाहनधारकांना थकीत दंडाची संपूर्ण रक्कम न भरता सवलतीसह दंडाचा निपटारा करण्याची संधी मिळणार आहे.
थकीत दंडावर 20 टक्क्यांपर्यंत सवलत
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक वाहनधारकांच्या नावावर हजारो रुपयांची दंडाची रक्कम प्रलंबित आहे. काही वाहनधारकांना एकापेक्षा अधिक ई-चलन जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण दंडाची रक्कम मोठी झाल्याने ती भरणे अनेकांना शक्य होत नाही. अशा वाहनधारकांना अभय योजनेचा फायदा होऊ शकतो. प्रलंबित दंडाच्या रकमेवर एकवेळची बाब म्हणून २० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
दंड भरून प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी
या योजनेमुळे प्रलंबित ई-चलन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी वाहनधारकांना संधी मिळणार आहे. सरकारचा उद्देश केवळ दंडाची वसुली करणे नसून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली वाहतूक दंडाची प्रकरणे निकाली काढणे हाही आहे. त्यामुळे ज्यांच्या वाहनांवर वाहतूक नियमभंगाचे दंड प्रलंबित आहेत, त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील पुढील सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
