मुंबई. राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, तसेच अन्नपदार्थांमधील भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना आळा बसावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार विविध जिल्ह्यांमध्ये तपासणी आणि धाडी टाकण्यात येत आहेत. या मोहिमेदरम्यान प्रशासनाने तब्बल 2 कोटी 23 लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त केला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 23 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, 8 विक्रेत्यांचे व्यवसाय बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही काळात अन्नपदार्थांमधील भेसळ, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, मुदत संपलेले पदार्थ विक्रीस ठेवणे, अस्वच्छ वातावरणात अन्ननिर्मिती आणि साठवणूक तसेच परवान्यांमधील अनियमितता अशा प्रकारांविरोधात FDAने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांच्या विक्रीत वाढ होत असल्याने अशा ठिकाणी विशेष लक्ष दिले जात आहे.

भिवंडीतील कंपनीवर सर्वात मोठी कारवाई; 2.06 कोटींचा माल जप्त

या संपूर्ण कारवाईतील सर्वात मोठी कारवाई ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात करण्यात आली. येथील अर्जुनाळी परिसरात असलेल्या DXP Ventures India Pvt. Ltd. या कंपनीच्या ठिकाणी FDAच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी आयात केलेल्या खाद्यपदार्थांवरील उत्पादन तारीख, एक्सपायरी डेट आणि कमाल किरकोळ विक्री किंमत (MRP) पुसून त्याऐवजी नवीन माहिती छापली जात असल्याचे प्राथमिक तपासात आढळले.

मूळ माहिती पुसण्यासाठी थिनर या रसायनाचा वापर केला जात होता. तसेच नव्याने तारखा आणि किंमत छापण्यासाठी यंत्रसामग्रीही आढळली. या कारवाईत तब्बल 2 कोटी 6 लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालामध्ये स्पार्कलिंग वॉटर, एनर्जी ड्रिंक्स, सोडा, सौदी कॉकटेल आणि विविध प्रकारच्या A2 बिलोना देशी तुपासह 14 प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम 23, 26 आणि 27 अंतर्गत प्रथमदर्शनी उल्लंघन झाल्याचे आढळले असून, पुढील तपास सुरू आहे.

    मुंबईतील सहा आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई

    मुंबई विभागातील सहा आस्थापनांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये पुढील आस्थापनांचा समावेश आहे.

    * 5 Spice आणि QIN’s – वांद्रे पश्चिम

    * EVE – सांताक्रूझ पश्चिम

    * Drogeria Sellers Pvt. Ltd. – कुलाबा

    * Annadata Cafe – कुलाबा

    * Chaayos – चर्चगेट

    * Blink Commerce Pvt. Ltd. – फोर्ट

    या आस्थापनांमध्ये तपासणीदरम्यान स्वच्छतेसंबंधी त्रुटी आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. परवाना निलंबित असलेल्या कालावधीत संबंधित आस्थापनांना खाद्यपदार्थांची खरेदी, विक्री किंवा वितरण करता येणार नाही.

    पुण्यातील खाऊ गल्लीत आठ विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

    पुण्यातील जे. एम. रोडवरील खाऊ गल्लीमध्ये FDAने 18 नोव्हेंबर रोजी विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण 17 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी आठ विक्रेते आवश्यक अन्न व्यवसाय परवाना किंवा नोंदणीशिवाय व्यवसाय करत असल्याचे आढळले. त्यामुळे या आठ विक्रेत्यांना व्यवसाय तातडीने बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आले आहेत.