जेएनएन, मुंबई. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्धसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात शोकप्रस्ताव मांडला. यावेळी बोलताना, मुख्यमंत्र्यांनासोबत द्यायला अजित पवार यांच्यासारखे अर्थमंत्री असावेत, अजित पवार राजकारणात नसते तर बांधकाम अभियंता झाले असते, असेही फडणवीस म्हणाले.
अन् अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली
‘अधिवेशनाच्या काळात सर्वांत आधी अजित पवार विधानभवनात यायचे. नेहमीच खुर्चीत दादा दिसायचे. सभागृह कितीही काळ चाललं तर दादा आपल्याजागी बसलेले पाहायला मिळायचे. आज ते आपल्यात नाहीत ही निश्चितपणे खंत आहे. यावर्षी दादांनी बारावं अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी 13 वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषराव यांच्याबरोबर बरोबरी केली असती. कदाचित त्या नंतरच्या कालावधीत सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे नेते म्हणून दादांकडे पाहिलं असतं. पण त्याआधीच दादा गेले. यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली.’ असं फडणवीस सभागृहात म्हणाले.
अजित पवारांनी ठामपणे निर्णय घेऊन लाडकी बहीण योजना सुरू केली
‘अर्थसंकल्पाच्या संदर्भात आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की, कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्यायला कधीही मागेपुढे पाहणारे अजित दादा होते. पण त्याचवेळी वित्तविभागाने लाडकी बहीण योजनेचा भार हा अर्थसंकल्पावर फार मोठ्या प्रमाणात पडेल, म्हणून याचा पुनर्विचार करावा असं सुचवल्यावरही अजित पवारांनी ठामपणे निर्णय घेऊन लाडकी बहीण योजना सुरू केली’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माझ्याकरता अत्यंत भावनिक प्रसंग
“लाडकी बहीण योजनेनंतर अजित पवारांनी गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली होती. त्यामुळे आम्हालाही गुलाबी जॅकेट घालायला लावलं होतं. आता या गोष्टी फक्त आठवणीत आहेत. खरंतर अशाप्रकारचा प्रस्ताव मांडणं घटनात्मक जबाबदारी आहे. पण मला असं वाटतं की माझ्याकरता अत्यंत भावनिक प्रसंग आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
