जेएनएन, मुंबई: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील न्यायालयांना धमकीचे ई-मेल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, खबरदारीचा उपाय म्हणून विविध न्यायालयांचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.

 माहितीनुसार, राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा न्यायालयांच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे संदेश प्राप्त झाले. या ई-मेलची माहिती मिळताच संबंधित न्यायालय प्रशासनाने पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने न्यायालय परिसरात धाव घेतली. न्यायालयातील न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि कामानिमित्त आलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तसेच न्यायालयाच्या परिसरात नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.

न्यायालय परिसरात पोलिसांकडून तपासणी
धमकीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून, न्यायालयाच्या इमारतींसह परिसराची तपासणी केली जात आहे. संशयास्पद वस्तू किंवा हालचाली आढळतात का, याची पाहणी सुरक्षा यंत्रणांकडून केली जात आहे. खबरदारी म्हणून काही ठिकाणी न्यायालयीन कामकाजही तात्पुरते थांबवण्यात आल्याची माहिती आहे.

सायबर पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध
दरम्यान, हा धमकीचा ई-मेल नेमका कोणी आणि कुठून पाठवला, याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. ई-मेलचा स्रोत, आयपी अॅड्रेस आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. एकाच वेळी राज्यातील अनेक जिल्हा न्यायालयांना धमकीचे ई-मेल पाठवण्यात आल्याने यामागे नेमके कोण आहे, तसेच या धमकीमागील उद्देश काय आहे, याचाही तपास केला जात आहे.

हेही वाचा: Sayaji Shinde: 'महाराष्ट्रात झाडखाऊ व्हायरस आला आहे!' वृक्षतोडीवर सयाजी शिंदे संतापले; जनआंदोलन उभारण्याचे नागरिकांना आवाहन