जेएनएन, नागपूर: महाराष्ट्रातील वृक्षतोड आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मुद्दा उपस्थित करत अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका प्रकल्पासाठी तब्बल 500 एकर परिसरातील 11 लाख झाडे तोडली जात असल्याचा दावा करत त्यांनी, ‘झाडांची कत्तल करून महाराष्ट्र विकायला काढला आहे,’ अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला. विकासाच्या नावाखाली निसर्गसंपत्तीचा बळी दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिंदे यांनी वृक्षतोडीच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना ‘झाडखाऊ’ नावाच्या व्हायरसचा उल्लेख केला. कोविडनंतर हा नवा व्हायरस महाराष्ट्रात आल्याचे सांगत, या व्हायरसमुळे सह्याद्रीच्या डोंगररांगांवर मोठे आक्रमण होत असल्याचे ते म्हणाले. हा व्हायरस म्हणजे झाडांची बेसुमार कत्तल आणि निसर्गसंपत्तीचा नाश, असा त्यांचा रोख होता. सह्याद्रीचे पर्यावरण आणि जैवविविधता टिकवण्यासाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
झाडतोड दिसताच नागरिकांनी एकत्र यावे
राज्यात ज्या ठिकाणी झाडांची कत्तल केली जात असेल, त्या प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, असे आवाहन सयाजी शिंदे यांनी केले. वृक्षतोडीविरोधातील आंदोलन केवळ काही पर्यावरणप्रेमींपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग असलेली लोकचळवळ बनली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या आंदोलनाच्या माध्यमातून दररोज झाडांची आरती करणे, थाळीनाद करून निषेध व्यक्त करणे आणि सोशल मीडियावरून वृक्षतोडीविरोधात आवाज उठवणे, असे उपक्रम राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले. झाडांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे, असे ते म्हणाले.
झाडे तोडून नव्याने लावण्याचे नाटक कशासाठी?
विकासकामांसाठी झाडे तोडल्यानंतर त्याबदल्यात नवीन झाडे लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात लावलेली किती झाडे जगतात, याबाबत पारदर्शक माहिती समोर येत नसल्याचा मुद्दा शिंदे यांनी उपस्थित केला. केवळ कागदावर वृक्षलागवड दाखवून पर्यावरण संवर्धन झाल्याचा दावा करणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
सरकारने प्रत्येक जिल्ह्यात आतापर्यंत किती झाडे लावली, त्यापैकी किती झाडे प्रत्यक्षात जगली आणि किती झाडे वाळून गेली, याचा सविस्तर हिशेब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी केली. वृक्षलागवडीचे आकडे जाहीर करण्यापेक्षा प्रत्यक्ष जगलेल्या झाडांची संख्या महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्ग वाचवण्यासाठी जनआंदोलनाची गरज
विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. मात्र, झाडे तोडून प्रकल्प उभारणे आणि नंतर वृक्षलागवडीची घोषणा करणे, हा पर्यावरण संवर्धनाचा पर्याय होऊ शकत नाही, असा संदेश सयाजी शिंदे यांनी दिला. सह्याद्रीसह राज्यातील नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहावे आणि वृक्षतोडीच्या विरोधात शांततापूर्ण पद्धतीने आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
