मुंबई. Elphinstone Road Overbridge : मुंबईतील प्रभादेवी स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रीज अखेर आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. या पुलाचे संपूर्ण पाडकाम आणि नव्या आधुनिक पुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (महारेल) रेल्वे प्रशासनाकडे तब्बल 78 मेगाब्लॉकची मागणी केली आहे.
सुरुवातीला या कामासाठी 72 ब्लॉक पुरेसे असतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र कामाचे तांत्रिक स्वरूप, विद्यमान वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने अधिक वेळ लागणार असल्याने महारेलने आता आणखी 6 ब्लॉकची भर घालत एकूण 78 ब्लॉकची मागणी रेल्वेकडे केली आहे.
ब्रिटिशकालीन पुलाचा शेवटचा टप्पा -
एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रीज हा मुंबईतील जुन्या आणि धोकादायक पुलांपैकी एक मानला जातो. ब्रिटिश काळात उभारलेला हा पूल दशकांपासून वापरात आहे.मध्य आणि पश्चिम रेल्वे जोडणाऱ्या या भागातील पुलावरून दररोज हजारो प्रवासी व वाहनांची ये-जा होत होती. मात्र पुलाच्या जुन्या रचनेमुळे तो असुरक्षित झाल्याने अखेर त्याच्या पाडकामाचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे व महारेलच्या संयुक्त समन्वयातून या पुलाचे पाडकाम व नव्या पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
पूल अधिक सुरक्षित आणि आधुनिक स्वरूपात-
महारेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, एल्फिन्स्टन रोडवरील नव्या पुलाचे डिझाइन पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असेल. या पुलात अधिक रुंद पादचारी मार्ग, सुरक्षा जाळी, एलिव्हेटेड प्रवेशमार्ग आणि दिव्यांगांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुलाच्या कामासाठी आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पाडकाम डिसेंबर अखेरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
