जेएनएन, रायगड: महाड शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर (Shiv Sena and NCP Clashes) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेपासूनच सुरू झालेल्या या धुमश्चक्रीच्या पार्श्वभूमीवर महाड पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचे पथसंचलन सुरू असून शीघ्र कृती दल (QRT) महाडमध्ये दाखल झाले आहे.
पोलिस अधीक्षकांनी दिली भेट
राड्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्वतः महाडला भेट दिली आहे. दलाल यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च असल्याचे सांगत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात
नगरवासियांमध्ये तणाव असला तरी परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आगामी मतदानाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी संपर्क उपक्रम वाढवले आहेत. नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी अधिकाऱ्यांकडून सातत्याने संवाद साधला जात आहे.
दोन्ही गटांवर पोलिसांकडून कारवाई
दरम्यान, राड्यात सहभागी असलेल्या दोन्ही गटांवर पोलिसांकडून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरात शांतता राखण्यासाठी पोलिस सदैव सज्ज आहेत, तसेच आवश्यक तेव्हा अतिरिक्त फोर्सही मागविण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे.
चौकाचौकात निरीक्षण वाढवले
महाडमधील वातावरण स्थिर करण्यासाठी पोलिस आणि स्थानिक प्रशासन सतर्क असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चौकाचौकात निरीक्षण वाढवण्यात आले आहे.
