जेएनएन, बुलढाणा: नगरपरिषद निवडणुकीसाठी (Municipal Council Elections 2025) आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होताच अवघ्या दीड तासांतच बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर दोन बोगस मतदारांना पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

मतदान केल्यानंतर त्याचा भांडाफोड

मिळालेल्या माहितीनुसार, या मतदान केंद्रावर वैभव देशमुख या मतदाराच्या नावावर कोथळी (ता. मोताळा) येथील एका व्यक्तीने मतदान करण्याचा प्रयत्न केला. मतदान केल्यानंतर त्याचा भांडाफोड झाला आणि तत्काळ त्याला पकडण्यात आले. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती असल्याचे उघड झाले. दोघांनाही अधिक चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दोन गाड्यांमध्ये भरून बोगस मतदार आणल्याचा काँग्रेसचा आरोप

याचबरोबर कोथळी आणि इब्राहिमपूर या गावांतून आणखी काही लोकांना बोगस मतदानासाठी आणल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली आहे. बुलढाणा शहरात घाटाखालून दोन गाड्यांमध्ये भरून बोगस मतदार आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून, मतदार आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी

    काँग्रेस पक्षाने हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे सांगत पोलिस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करावेत आणि निवडणूक प्रक्रियेत कोणताही व्यत्यय येऊ नये याची हमी घ्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी मतदान केंद्रांवरील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केली आहे आणि संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

    बोगस मतदानाचा प्रकार समोर 

    निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच बोगस मतदानाचा प्रकार समोर आल्याने प्रशासनावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.