मुंबई. Local Body Election 2025 : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द  करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज 16 जिल्ह्यांतील नगरपरिषद / नगरपंचायतीमध्ये  सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर (कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा), पुणे (बारामती, फुरसुंगी-उरुळी  देवाची), सोलापूर (अनगर, मंगळवेढा), सातारा (महाबळेश्वर, फलटण), छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री), नांदेड (मुखेड, धर्माबाद), लातूर (निलंगा, रेणापूर), हिंगोली (वसमत), अमरावती (अंजनगावसूर्जी), अकोला (बाळापूर), यवतमाळ (यवतमाळ), वाशिम (वाशिम), बुलढाणा (देऊळगावराजा), वर्धा (देवळी) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस यांचा समावेश आहे, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 264 नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज (मंगळवार) सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. 6,042 जागांसाठी आणि 264 नगराध्यक्ष पदांसाठी ही निवडणूक होत आहे. मतदान सकाळी 7.30 वाजता सुरू झाले आणि सायंकाळी 5.30 वाजता संपेल. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.