जेएनएन, मुंबई. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana Latest News) ही राज्य सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळतात.
मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते येण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र, अद्यापही काही लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते मिळाले नाही. त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. (March April installment Coming)
मार्च- एप्रिल महिन्यासाठी एकत्रित निधी मंजूर
वित्त विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी माहे मार्च, 2026 करिता रू. 365 कोटी व माहे एप्रिल, 2026 करिता रू. 365 कोटी असा एकूण रू. 730.5100 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये
मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता. त्यांना आता हा लाभ मिळणार आहे. सरकारने 730.5100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे 1500-1500 रुपये जमा होणार आहेत. मात्र, हे हप्ते एकत्र येऊ शकतात किंवा वेगवेगळे याबाबत अद्याप कोणतीही सूचना नाही.
टप्प्याटप्प्याने जमा होणार पैसे
ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया यापूर्वीच यशस्वीरीत्या पूर्ण झालेली आहे, अशा पात्र महिलांचे पैसे शासनाकडून टप्प्याटप्प्याने वितरित केले जात आहेत. संबंधित महिलांनी जिल्हा कार्यालयात न येता थेट आपल्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा झाली आहे की नाही, याची खात्री करावी.
येथे करा चौकशी
लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळत असलेल्या लाभार्थांना मार्च-एप्रिल महिन्यांचा लाभ मिळाला नसेल तर ते या संदर्भात तालुक्यांच्या किंवा जिल्ह्यांच्या महिला व बाल कल्याण विभागात या बाबत अधिकची माहिती घेऊ शकतात. त्यांनी केवायसी पूर्ण केली नसेल त्यांना लाभ मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
181 हेल्पलाईन नंबरवर करा चौकशी
लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात असून, या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. मात्र, अलीकडच्या काळात ई-केवायसी संदर्भातील त्रुटी, बँक खात्याशी संबंधित अडचणी, तसेच हप्ता थांबण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारने 181 हेल्पलाईन नंबर (Ladki Bahin Yojana helpline number) सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
नवीन e-KYC साठी संधी नाही
सध्या प्रसार माध्यमांमध्ये "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत लाडक्या बहिणींना ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे, अशी बातमी पसरत आहे. ज्या महिला ऑनलाईन पद्धतीद्वारे किंवा योग्य कागदपत्रांभावी ई-केवायसी (e-KYC) करू शकल्या नाहीत, त्यांना आता ऑनलाईन ऐवजी थेट जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे जमा करण्याची मुभा सरकारने दिली आहे, असा दावा या बातम्यांमधून केला जात आहे. सदर बातम्यांवर विश्वास ठेवण्यात येवू नये, असे आवाहन राज्यातील नागरिकांना शासनस्तरावरुन करण्यात आले आहे.
