मुंबई l Ladki Bahin Yojana December Installment : राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) यंदाच्या महिन्यात संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर 1500 रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असतानाही निवडणूक आयोगाने नियमित योजनेचा लाभ देण्यास परवानगी दिल्याने आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. मात्र जानेवारी महिन्याचा हफ्ता अगाऊ देण्यास आयोगाने आक्षेप घेतल्याने महिलांचा थोडा हिरमोड झाला आहे.

आज सकाळपासूनच अनेक लाभार्थी महिलांच्या मोबाईलवर बँक मेसेज येण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे महिलांमध्ये समाधान आणि उत्साहाचं वातावरण आहे. ‘लाडकी बहीण’ योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

दरम्यान, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे या योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट भूमिका घेत नियमित किंवा प्रलंबित हप्ते देण्यास परवानगी दिली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता आगाऊ स्वरूपात देण्यास आयोगाने मज्जाव केला आहे. त्यामुळे सध्या लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला आहे.

या निधीमुळे संक्रांत सणाच्या काळात महिलांना घरखर्च, सणासुदीच्या खरेदीसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार मिळणार आहे. सरकारकडून पुढील टप्प्यात उर्वरित लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने रक्कम वितरित केली जाणार असल्याची समोर आली आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ नियमितपणे मिळावा, यासाठी प्रशासनाकडून बँक खात्यांची पडताळणी, आधार लिंकिंग आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यावर भर दिला जात असून, ज्या महिलांना अद्याप रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी संबंधित बँक शाखा किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.