जेएनएन, मुंबई: राज्यातील महिलांना आर्थिकदृष्टा मजबूत करण्यासाठी राज्यात सरकारने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली. या योजनाची सुरुवात ही 28 जून 2024 रोजी झाली होती. या योजनेमार्फत महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. 1500/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येत आहे. जवळपास अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. यापैकी सुमारे 26 लाख लाभार्थ्यांनी अपात्र असतांनाही सरकारची फसवणूक करुन लाभ घेतला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यांनी त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचीही माहिती दिली आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी पात्र कोण आहे?
महिला आणि बाल कल्याण विभागाच्या माहिती नुसार,
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा,
- राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना लाभ मिळेल.
- लाभार्थ्यांचे किमान वय 21 वर्षे पूर्ण असावे तर कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत योजनेचा लाभ मिळेल.
- लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
या महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत
- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. 2.50 लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
- सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु.1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/ उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
या नियमानुसार, योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही वरील नियमापैकी एकाही नियमात बसल असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठराल.
26.34 लाख लाभार्थी बनावट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
बनावट लाभार्थांवर होणार कारवाई
शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता या बनावट लाभार्थ्यांवर शासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.