जेएनएन, मुंबई: राज्यातील वाढत्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. विधानसभा अध्यक्षांनी आदेश देऊनही गॅस परिस्थितीबाबत माहिती देण्यास सरकार तयार नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. (Jayantrao Patil on LPG Shortage)
जयंतराव पाटील म्हणाले की, गॅसचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. “जनतेला विश्वासात घेणं गरजेचं आहे. सर्व पक्षांना सोबत घेऊन सरकारने स्पष्ट सांगावं की हा प्रश्न नेमका कसा सोडवणार आहे. हाच आमचा विधानसभेत चर्चा करण्यामागचा उद्देश होता मात्र सरकारने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा
राज्यात अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. “ही परिस्थिती अजिबात समाधानकारक नाही. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत यात लक्ष घालणं अपेक्षित होतं. मात्र सरकार या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत आहे. उलट विरोधकांवरच खापर फोडलं जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
लाईव्ह |📍विधान भवन, मुंबई ⏭️ 17-03-2026 पत्रकारांशी संवाद
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 17, 2026
https://t.co/MFeX6d1FiX
सरकारला ठोस उपाययोजना करायची इच्छाच दिसत नाही
“गॅस उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेला रोज अनुभवावी लागत आहे. ही जबाबदारी पूर्णपणे सरकारची आहे. तथाकथित ‘डबल इंजिन’ सरकारला यावर ठोस उपाययोजना करायची इच्छाच दिसत नाही,” असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरही भाष्य करताना पाटील म्हणाले की, “अलीकडे दोन जहाजांच्या आगमनावर देशभर आनंद व्यक्त केला जात आहे. पण प्रत्यक्षात देशाला दररोज अशा अनेक जहाजांची गरज असते. पूर्वी इराण सोबत चांगले संबंध होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत समुद्रधुनीतून जहाजांच्या हालचालींवर निर्बंध येत असल्याचे चित्र आहे. चुकीच्या परराष्ट्र धोरणाचा हा परिणाम आहे का, याचाही विचार जनतेने करायला हवा.”
गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असून येत्या काळात हा विषय अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सरकारकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
