जेएनएन, मुंबई: अरबी समुद्रात वादळी हवामान आणि प्रचंड लाटांच्या तडाख्यात बोटीत पाणी घुसल्याने ‘अमृत-१६’ नावाची मदत-नौका पाण्यात बुडाली आहे. या दुर्घटनेत सहा खलाशांपैकी पाच जणांना तटरक्षक दलाने वाचवण्यात यश आले. तर एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे. या दुर्घटनेने किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
‘अमृत-१६’ ही मदत-नौका वाढवण किनाऱ्याजवळ गस्तीवर होती. दरम्यान, नौकेच्या अभियांत्रिकी विभागातील यंत्राच्या खोलीत अचानक पाणी शिरू लागले. अभियंत्यांना हे लक्षात आल्यानंतर काही क्षणांतच नौकेत मोठ्या प्रमाणावर पाणी साचू लागले. पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की नौकेवरील यंत्रणा बंद पडल्या आणि संपूर्ण नौका काही मिनिटांत नियंत्रणाबाहेर गेली.
या संकटाच्या वेळी नौकेवर सहा कर्मचारी होते. त्यापैकी पाच जणांनी वेळेवर डेकवर येऊन स्वतःचा जीव वाचवला, तर 23 वर्षीय राहुलकुमार यादव हा कर्मचारी पाण्यात वाहून गेला आणि तो अद्याप बेपत्ता आहे.
तत्काळ मदत
बचावलेल्या कर्मचाऱ्यांनी जवळ असलेल्या ‘अत्रिपुणा’ नावाच्या दुसऱ्या मदत-नौकेशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले. ‘अत्रिपुणा’वरील कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देत बचावकार्य सुरू केले आणि सर्व पाच जणांना सुरक्षितपणे वाचवले. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास सागरी बचाव समन्वय केंद्राला (मुंबई) या दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाचे ‘अमृत-16’ ऑपरेशन सुरू करण्यात आले.
तटरक्षक दलाचे धाडसी बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच कमांडर जितू आय. जोस यांच्या नेतृत्वाखालील तटरक्षक दलाचे बचाव पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. समुद्रात 15 ते 18 फूट उंच लाटा, तीव्र वारे आणि रात्रीचे अंधार यामुळे शोधमोहीम अत्यंत जोखमीची ठरली. तरीही दलाने समुद्रात उतरून सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पाच खलाशांना सुरक्षित बाहेर काढले.
सध्या बेपत्ता खलाशी राहुलकुमार यादवचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, तटरक्षक दल, नौदल आणि स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने सागरी तपासणी सुरू आहे.
