जेएनएन, मुंबई. आयआयटी बॉम्बेमधील बी.टेक.चा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा आणि वसतिगृहातील राहणीमानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी बॉम्बे प्रशासनाकडून वसतिगृहांच्या खोल्यांच्या रचनेत बदल करण्यासह विद्यार्थ्यांसाठी ‘ट्विन शेअरिंग’ अर्थात एका खोलीत दोन विद्यार्थ्यांना ठेवण्याच्या पर्यायाचा विचार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यार्थ्यांना एकाकीपणाचा सामना करावा लागू नये, त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देता यावे आणि वसतिगृहातील सुरक्षिततेत सुधारणा व्हावी, या उद्देशाने हा पर्याय तपासला जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या व्यवस्थेची अंमलबजावणी कधीपासून होणार, ती सर्व वसतिगृहांना लागू होणार की टप्प्याटप्प्याने राबवली जाणार, याबाबत अधिकृत निर्णय अद्याप झाला नाही. 

पहिल्या वर्षापुरती मर्यादित व्यवस्था आता सर्व विद्यार्थ्यांसाठी?

आयआयटी बॉम्बेमध्ये सध्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना साधारणपणे दोन विद्यार्थ्यांची सामायिक खोली दिली जाते. मात्र, दुसऱ्या वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना स्वतंत्र खोल्या मिळण्याची व्यवस्था आहे. आता ही पद्धत बदलून सर्व वर्षांतील विद्यार्थ्यांसाठी ट्विन शेअरिंगचा पर्याय लागू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांमध्येही अशाच प्रकारची व्यवस्था असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रस्तावावर संस्थेचे संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या खुल्या चर्चासत्रातही चर्चा झाली आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तातडीने कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत प्राध्यापकांकडून सूचना मागवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

    उच्च शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी आयआयटीसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेतात. अभ्यासाचा ताण, परीक्षा, शैक्षणिक अपेक्षा, भविष्यातील करिअरची चिंता आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याचे आव्हान अशा विविध गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

    अशा परिस्थितीत वसतिगृहात सहविद्यार्थ्यासोबत राहिल्याने संवाद वाढण्यास, अडचणीच्या काळात भावनिक आधार मिळण्यास आणि एकाकीपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, केवळ खोलीत दोन विद्यार्थी राहतात म्हणून मानसिक आरोग्याच्या समस्या दूर होतीलच, असे नाही. त्यासाठी समुपदेशन, वेळेवर मदत, संवेदनशील शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण यांनाही महत्वाचे ठरणार आहे.

    समुपदेशन आणि इतर उपाययोजनांवरही भर

    साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी संस्थेने इतर उपाययोजनांचाही विचार सुरू केला आहे. काही वसतिगृहांमधील समुपदेशनाच्या वेळा वाढवणे आणि विद्यार्थ्यांना बाह्य समुपदेशन सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत उपलब्ध करून देणे यांसारख्या उपाययोजनांचा त्यात समावेश आहे.

    दरम्यान, साहिलच्या मृत्यूच्या परिस्थितीचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू असून, त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या छळ आणि जातीय भेदभावाच्या आरोपांचीही चौकशी होत आहे. या प्रकरणात विविध आरोप आणि दावे तपासाधीन आहेत. त्यामुळे मृत्यूमागील कारणांबाबत अंतिम अहवाल लवकरच समोर येणार आहे.