मुंबई/नवी मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत यंदा मोठ्या उत्साहात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला भावपूर्ण निरोप देताना शहरातील विविध विसर्जन घाटांवर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महापालिका प्रशासनाने विसर्जनासाठी केलेल्या नियोजनामुळे विविध ठिकाणी विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली.
नवी मुंबईत एकूण 24 हजार 390 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये 23 हजार 891 घरगुती गणेशमूर्तींचा, तर 348 सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे. घरगुती गणपतींच्या विसर्जनावेळी नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला.
गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण कमी व्हावा, यासाठी शहरात 151 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली होती. तसेच विविध विसर्जनस्थळांवर आवश्यक मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आले होते.
लालबागच्या राजाचे काही वेळात गिरगाव चौपाटीवर विसर्जन
दरम्यान, मुंबईतील मानाचा आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूकही उत्साहात सुरू आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबईच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक लोटले आहेत.
लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ झाला असून, काही वेळात गिरगाव चौपाटीवर बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे गिरगाव चौपाटी परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पोलिस आणि प्रशासनाकडून गर्दीचे नियोजन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आले आहेत.
