जेएनएन, नागपूर : देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी देशभरातील असंख्य क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. ‘भारत छोडो’ आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ यांसह विविध आंदोलनांत ब्रिटिश सत्तेविरोधात जनतेने आवाज उठवला. या लढ्यात अनेकांनी पोलिसांच्या गोळ्या आणि लाठीमाराचा सामना केला. हातात तिरंगा घेऊन आंदोलनाच्या अग्रभागी उभ्या राहिलेल्या या वीरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. राष्ट्रध्वजाची शान राखण्यासाठी त्यांनी प्रसंगी प्राणांची आहुती दिली.

आज, भारताच्या स्वातंत्र्याला 79 वर्षे पूर्ण होत असताना आणि 80 वे स्वातंत्र्य वर्ष सुरू असताना, महाराष्ट्रातील अशाच हुतात्म्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात महाराष्ट्रातील असंख्य वीरांनी निर्भयपणे ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. त्यापैकी तिरंग्याची शान राखत हौतात्म्य पत्करणाऱ्या पाच वीरांची ही प्रेरणादायी गाथा...

सातारा, 1942 : रामू कृष्णा सुतार
1942 मध्ये महात्मा गांधींनी ‘करो या मरो’चा संदेश देत भारत छोडो आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनाची लाट सातारा जिल्ह्यातही पोहोचली. खटाव तालुक्यातील रामू कृष्णा सुतार यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

9 सप्टेंबर 1942 रोजी परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा वडूज येथे काढण्यात आला. ब्रिटिश सत्तेला आव्हान देत मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला होता. मोर्चेकरी कचेरीच्या दिशेने पुढे जात असताना ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

या गोळीबारात राम कृष्णा सुतार यांच्यासह नऊ जणांना हौतात्म्य आले. स्वातंत्र्याच्या ध्यासासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सुतार यांचे बलिदान साताऱ्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाले.

वर्धा, 1942 : उदेभान कुबडे
शेतकरी कुटुंबातील उदेभान कुबडे हेही भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले होते. महात्मा गांधींच्या ‘चले जाव’च्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधातील आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

    16 ऑगस्ट 1942 रोजी वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकवण्यासाठी आंदोलकांचा मोर्चा निघाला. ब्रिटिश राजवटीविरोधातील हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला.

    या गोळीबारात उदेभान कुबडे यांच्या छातीवर गोळी लागली आणि त्यांना वीरमरण आले. ‘भारत माता की जय’चा जयघोष करत मातृभूमीसाठी प्राण देणाऱ्या कुबडे यांचे बलिदान आष्टीच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील प्रेरणादायी अध्याय ठरले.

    नागपूर, 1942 : सखाराम मतेवार
    नागपूरचे सखाराम मतेवार यांनीही 1942 च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिश सत्तेच्या प्रतीकांना आव्हान देत सरकारी इमारतीवर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला.

    या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सखाराम मतेवार हुतात्मा झाले. राष्ट्रध्वज आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या मतेवार यांचे नाव नागपूरच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कायम स्मरणात राहिले आहे.

    मुंबई, 1930 : कालीशंकर बाजपेयी
    1930 मध्ये देशभर सविनय कायदेभंग आंदोलनाची लाट उसळली होती. याच काळात मुंबईतील कालीशंकर बाजपेयी हे वरळी युथ लीगचे अध्यक्ष आणि स्थानिक कामगार नेते म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते.

    हुतात्मा बाबू गेनू यांच्या अंत्ययात्रेत बाजपेयी हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. अंत्ययात्रा रोखण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी लाठीचार्ज आणि संगिनीने हल्ला केला. या हल्ल्यात बाजपेयी यांना गंभीर दुखापत झाली.

    मात्र, पोलिसांच्या हल्ल्याची पर्वा न करता त्यांनी हातातील तिरंगा खाली पडू दिला नाही. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 19 डिसेंबर 1930 रोजी त्यांचे निधन झाले.

    तिरंग्याची शान राखत प्राणांची आहुती देणारे कालीशंकर बाजपेयी यांचे बलिदान देशभक्ती, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक ठरले.

    सांगली, 1930: सीताराम चांभार
    स्वातंत्र्यलढ्यातील आणखी एक हृदयस्पर्शी घटना सांगली जिल्ह्यातील बिळाशी गावात घडली. 1930 मध्ये सविनय कायदेभंग आंदोलनाच्या काळात ब्रिटिशांच्या वन कायद्याविरोधात बिळाशी येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला.

    आंदोलकांनी सागवानाचे झाड तोडून आणून त्यावर काँग्रेसचा ध्वज फडकावला. ब्रिटिश सत्तेला हे थेट आव्हान होते. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी गावात दाखल झाली. त्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला आणि गोळीबार करण्यात आला.

    या गोळीबारात सीताराम चांभार या कोवळ्या वयातील युवकाला वीरमरण आले. बिळाशी जंगल सत्याग्रहात सीताराम चांभार यांच्यासह धोंडी संतू कुंभार यांच्याही हौतात्म्याची नोंद महाराष्ट्राच्या गॅझेटियरमध्ये आढळते.

    लहान वयातच स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या सीताराम चांभार यांचे नाव महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाले.

    सांगली - 1942 उमाशंकर पंड्या
    उमाशंकर हे सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कर कारखान्यातील अभियंता होते. ३ सप्टेंबर १९४२ रोजी तासगाव येथील मामलेदार कार्यालयावर यशस्वीपणे राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या सार्वजनिक सभेचे ते एक आयोजक होते. ४०० कामगारांसह इस्लामपूर (ईश्वरपूर) कचेरीवर त्यांनी मोर्चा काढला. यावेळी, गोळीबाराचा आदेश देणाऱ्या पोलीस अधीक्षकांना थांबवण्याचा प्रयत्न करताना थेट त्यांच्यावरच गोष्टी झाडली गेली.

    तिरंग्यासाठी प्राण देणाऱ्या वीरांना अभिवादन
    महाराष्ट्राच्या भूमीने स्वातंत्र्यलढ्याला असंख्य शूरवीर दिले. रामू कृष्णा सुतार, उदेभान कुबडे, सखाराम मतेवार, कालीशंकर बाजपेयी आणि सीताराम चांभार यांसारख्या वीरांनी ब्रिटिश सत्तेच्या दडपशाहीसमोर माघार घेतली नाही.

    त्यांच्यासाठी तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नव्हता, तर तो स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि भारताच्या भवितव्याचे प्रतीक होता. त्यामुळेच पोलिसांच्या गोळ्या आणि लाठ्यांचा सामना करतानाही त्यांनी राष्ट्रध्वजाची शान अबाधित ठेवली.

    आज आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांचे बलिदान स्मरणात ठेवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

    (source- Pib Mumbai)

    हेही वाचा: ‘समाधी’ चित्रपटाने घराघरात पोहोचवले, पण हे गीत नेताजींच्या आझाद हिंद फौजेचे होते; जाणून घ्या इतिहास