जेएनएन, नवी मुंबई/सिंधुंदुर्ग: तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. चिपी विमानतळावरून आता नवी मुंबईसाठी आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये रविवारचाही समावेश असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत विमानसेवेच्या मर्यादित वेळापत्रकामुळे प्रवासाचे नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या सिंधुदुर्गवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सोशल मीडियावर (ट्विटद्वारे) यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.माहितीनुसार, चिपी ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते चिपी या दोन्ही मार्गांवर दररोज विमानसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे सोमवार ते रविवार अशा संपूर्ण आठवड्यात प्रवाशांना विमानप्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबईहून सकाळी 7.55 वाजता उड्डाण
दीपक कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानसेवेचे प्रस्तावित वेळापत्रकही समोर आले आहे. त्यानुसार नवी मुंबई विमानतळावरून सकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी विमान उड्डाण करेल. हे विमान सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांच्या अंतराने म्हणजेच सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी चिपी येथून नवी मुंबईच्या दिशेने विमान उड्डाण करेल. हे विमान सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावर दाखल होईल.
अशा प्रकारे नवी मुंबई ते चिपी आणि चिपी ते नवी मुंबई असा प्रवास सुमारे 70 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. विशेष म्हणजे, ही सेवा रविवारसह आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार असल्याने नोकरदार, व्यावसायिक, पर्यटक आणि गावी ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना याचा फायदा होणार आहे.
विमानसेवेसाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत
चिपी विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने यापूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चिपी-नवी मुंबई आणि नवी मुंबई-चिपी या दोन्ही मार्गांवरील विमानसेवा व्यवहार्य करण्यासाठी व्यवहार्यता तफावत निधी (Viability Gap Funding - VGF) देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक आसनामागे 6 हजार 200 रुपयांचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली असून, एका वर्षासाठी सुमारे 16 कोटी 74लाख 62 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी चिपी-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, मुंबई विमानतळावर आवश्यक वेळेचा स्लॉट उपलब्ध न झाल्याने नवी मुंबई विमानतळाचा पर्याय पुढे आला.
पर्यटन आणि व्यापाराला मिळणार चालना
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मालवण, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला, आंबोली यांसारख्या पर्यटनस्थळांना दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातून सिंधुदुर्गात पोहोचण्यासाठी रस्ते किंवा रेल्वे प्रवासाला बराच वेळ लागतो.
आता नवी मुंबई विमानतळावरून थेट चिपी विमानतळापर्यंत विमानसेवा सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग, स्थानिक व्यापार तसेच कोकणातील रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे.
विशेषतः मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात राहणाऱ्या सिंधुदुर्गवासीयांना आता शनिवार-रविवार किंवा सुट्टीच्या दिवशीही विमानाने गावी जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
