जेएनएन, नागपूर. लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे. न्यायव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्यायव्यवस्थेवर आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

हा विश्वास कायम ठेवण्यासाठी उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली विधी महाविद्यालये व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

मी जे काही घडलो त्यात

मी जे काही घडलो त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा वाटा खूप मोठा आहे. येथील गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाच्या बळावर एक आमदार ते मुख्यमंत्री म्हणून कायदेमंडळाच्या प्रतिनिधीत्वाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मी विश्वासाने सार्थ करु शकत असल्याची कृतार्थ भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पहिल्याच टर्ममध्ये मला उत्कृष्ट

    कायदेमंडळाचा प्रतिनिधी म्हणून कायदेविषयक संकल्पना या अतिशय सुस्पष्ट माहित असणे आवश्यक आहेत. त्या बळावर आमदार म्हणून पहिल्याच टर्ममध्ये मला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला असे त्यांनी सांगितले.

    उत्तम वकील आवश्यक

    ज्ञानाच्या परिभाषा या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पार्श्वभूमीवर वेगाने बदलत आहेत. सर्वच ज्ञानशाखांना हे आव्हान आहे. या बदलत्या तंत्रज्ञानाचा चपखल उपयोग आपण केला पाहिजे. न्याय प्रणालीला यातून गती मिळू शकते हे आपण समजून घेतले पाहिजे. न्यायव्यवस्था जर उत्तम हवी असेल तर उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली महाविद्यालये व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता आहे.

    महाराष्ट्रामध्ये या दृष्टीने चांगल्या तीन लॉ स्कूल अर्थात विधी महाविद्यालय उभारण्याचे भाग्य मला मिळाले. न्यायमूर्ती  सिरपूरकर यांच्या पुढाकाराने इथे आपण नॅशनल लॉ स्कूल उभारू शकलो, असे ते म्हणाले.

    मनस्वी आनंद

    शंभर वर्षांचा वैभवी वारसा असलेल्या या महाविद्यालयाच्या नवीन वास्तूला शासनातर्फे  सर्वतोपरी मदत करु. यात कोणतीही कमतरता आम्ही पडू देणार नाही. या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून मला उपस्थित राहताना मनस्वी आनंद झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

    लोकशाही मूल्यांमध्ये सर्वांत महत्त्वाचे मूल्य हे संविधानातील मूलभूत तत्वात आहे. या मूलभूत तत्वांवरच सर्वांना न्यायाची हमी आहे. वेळेत न्याय मिळणे यातच लोकशाहीच्या सक्षमीकरणाचा मार्ग दडला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

    शिक्षण संस्थेचा पाया

    प्रबोधन, प्रशिक्षण, संशोधन यात त्रिसूत्रीवरच कोणत्याही शिक्षण संस्थेचा पाया भक्कम होत जातो.  बदलते तंत्रज्ञान याचा विधी प्रक्रियेत जितका चांगला उपयोग होईल त्या प्रमाणात दीर्घकाळ चालणारी न्यायालयीन प्रकरणे तत्काळ मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.