जेएनएन, रत्नागिरी: दिल्लीतील बॉम्ब स्फोटाच्या गंभीर घटनेनंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्क झाले आहेत. राजधानीतील या स्फोटाचा परिणाम आता महाराष्ट्रावरही उमटू लागला आहे. कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संपूर्ण सागरी पट्ट्यात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सर्व किनारी भागांवर पोलिस आणि तटरक्षक दलाने संयुक्त गस्त वाढवली आहे. समुद्रमार्गे कुठलीही संशयास्पद हालचाल होऊ नये म्हणून गस्तीदल सतत नजर ठेवत आहे. 

सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत

रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर कोकणातील तब्बल 525 लँडिंग पॉईंट्स संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. सागरी किनारे, घाटमार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. सर्व वाहनांची आणि संशयास्पद व्यक्तींची काटेकोर तपासणी सुरू आहे. 

मच्छीमारांनाही सतर्क राहण्याचे आवाहन

यासोबतच सागरी सुरक्षा दल, स्थानिक पोलीस, होमगार्ड आणि गुप्तचर यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत. किनारी गावांतील मच्छीमारांनाही सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद बोट, व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    कोस्टल रडार यंत्रणा सक्रिय

    रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने सांगितले की, या तपासणी मोहीमेत ड्रोन सर्व्हेन्स, नाईट पेट्रोलिंग, आणि कोस्टल रडार यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहेत.