मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेला आता राजकीय महत्त्व प्राप्त झाले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतलाच, तर तो आमच्याशी चर्चा करूनच अंतिम केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या हालचालींकडे महायुतीतील घटक पक्षांचेही लक्ष असल्याचे अधोरेखित झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांकडून यासंदर्भात वेगवेगळी विधाने केली जात असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. विलीनीकरणाबाबत संबंधित पक्षांनी कोणताही निर्णय घेतल्यास महायुतीतील सहकारी पक्षांशी चर्चा करणे आवश्यक असल्याचा संकेत त्यांच्या विधानातून मिळत आहे.
दरम्यान, राज्यातील तीन पक्षांचे सरकार चालविताना समन्वय आणि संवादाला विशेष महत्त्व असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष सत्तेत आहेत. प्रत्येक पक्षाची स्वतंत्र राजकीय भूमिका, संघटनात्मक रचना आणि कार्यपद्धती असल्याने सरकार चालविताना परस्पर समन्वय राखणे आवश्यक असते. निर्णय प्रक्रियेत संवाद कायम ठेवला, तर सरकारचा कारभार अधिक प्रभावीपणे चालविता येतो, असे ही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
