पुणे. Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जोर धरला असताना आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये एकत्र येण्याबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष होते.

मात्र, पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांनी या विषयावर कोणतेही स्पष्ट भाष्य करण्याचे टाळले. “जशी वेळ येईल, तशा गोष्टी आपल्याला कळतीलच,” असे सूचक विधान करत त्यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर थेट उत्तर देण्याचे टाळले. त्यांच्या या एका वाक्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा या चर्चेला वेग आला. 10 नोव्हेंबरनंतर शरद पवार यांची पुन्हा भेट घेण्याचे संकेतही पटेल यांनी दिले होते.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही बारामतीत येऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पक्षाच्या वतीने निर्णय घेण्याचा अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चेत सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चर्चेवर भाष्य करताना, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत शरद पवार आणि सुनेत्रा पवार हेच स्पष्ट करू शकतील, असे म्हटले होते. भाजपला याबाबत अद्याप कोणीही माहिती दिलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.