जेएनएन, मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना ‘सर्वसमावेशक पीक योजने’अंतर्गत खरीप हंगाम 2023 मधील झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे. राज्य शासनाने पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक, जळगावसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  1927 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 

पीक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते. म्हणजेच ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी 110% पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासनातर्फे देण्यात येते. खरीप हंगाम 2023 मधील मंजूर 7,621/- कोटी रुपये पैकी विमा कंपनी मार्फत 5469 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आले आहे.

उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी 1927 कोटी रुपये ची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती. ही मंजूर रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून याबाबत 30 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. ही रक्कम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली.

या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ
नाशिक रु. 656/- कोटी, जळगाव ₹ 470/- कोटी, अहमदनगर ₹ 713/- कोटी, सोलापूर ₹ 2.66 कोटी, सातारा ₹ 27.73 कोटी आणि चंद्रपूर ₹ 58.90 कोटी.