जेएनएन, मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात GST दर कपातीची माहिती दिली. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

लुटीची जबाबदारी घ्यावी

2017 मध्ये मोदीजींनीच स्वतः प्रचंड वाढीव दराने GST आणून देशातील उद्योग, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना त्रस्त केले, त्यांची प्रचंड आर्थिक लूट केली. तेच मोदीजी आज GST दर कमी केले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. गेल्या आठ वर्षांत GST संकलन दुप्पट वाढून 22 लाख कोटींवर गेले आहे आणि याचा सर्वाधिक फटका ग्राहक व छोट्या व्यवसायांना बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर कमी करण्याचे श्रेय घेताना आठ वर्ष वाढीव दराने केलेल्या लुटीची जबाबदारी ही घेतली पाहिजे असे असं सपकाळ म्हणाले.

पेट्रोल-डिझेलच्या दरांवर मोदीजी गप्प

“राहुल गांधी यांनी खूप आधीच सांगितले होते की, मोदींजींनी GST ला गब्बर सिंग टॅक्स मध्ये परिवर्तित केले आहे. दर कमी करून जनतेची लूट थांबवा अशी मागणीही त्यांनी सातत्याने केली होती. त्यावर निर्णय घ्यायला मोदींनी काही वर्ष उशीर केला. पेट्रोल-डिझेलच्या दरांवर मात्र मोदीजी गप्प आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली. 

‘आत्मनिर्भरते’ची शिकवण देताना स्वतः मात्र ऐषआरामी जीवनशैलीत गुंतलेले आहेत. त्यांनी आज सांगितले की हा बचत महोत्सव आहे मग गेली आठ वर्ष काय लूट महोत्सव सुरु होता का ? हे ही त्यांनी सांगावे, असं ते म्हणाले.

    त्यांच्या आजच्या भाषणात उत्साह आणि आत्मविश्वासाची कमी होती. पंतप्रधानांनी लोकांची दिशाभूल करणाऱ्या भाषणांपेक्षा महागाई, बेरोजगारी, शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले.