मुंबई. मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारा तीन महत्त्वाच्या उड्डाणपुलांचे लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शीव रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी हे तीन प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत.
दुपारी 1 वाजता लोकार्पण सोहळा
मुंबई महापालिकेने उभारलेल्या या तीन पुलांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम दुपारी १ वाजता व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. संबंधित पुलांच्या ठिकाणीही या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
या पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतरही औपचारिक लोकार्पणाच्या प्रतीक्षेमुळे वाहतुकीसाठी खुले होण्यास विलंब झाला होता. आता या तिन्ही प्रकल्पांमुळे मुंबईतील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांवरील कोंडी कमी होण्यास आणि प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
शीवचा नवा रेल्वे उड्डाणपूल
112 वर्षे जुन्या पुलाची जागा घेणार आहे. शीव रेल्वे स्थानकाजवळील जुना पूल सुमारे 112 वर्षे जुना होता. संरचनात्मक तपासणीत असुरक्षित ठरल्याने त्याच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले. नव्या पुलामुळे धारावी, वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला आणि पूर्व द्रुतगती महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना महत्त्वाचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका उभारण्याचे नियोजन आहे. जुन्या पुलाचे रेल्वे रुळांमधील खांब या विस्तारासाठी अडथळा ठरत होते. त्यामुळे नव्या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.
रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे काम मध्य रेल्वेने, तर महापालिकेच्या हद्दीतील जोडरस्त्यांचे काम मुंबई महापालिकेने केले आहे. या पुलामुळे रस्ते वाहतूक पूर्ववत होण्यासोबतच भविष्यात रेल्वे मार्गिकांच्या विस्तारासाठीही मदत होणार आहे.
विद्याविहार उड्डाणपूल
पूर्व-पश्चिम प्रवास 30 मिनिटांवरून 10 मिनिटांवर होणार आहे.
घाटकोपर आणि विद्याविहार परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेला उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे. हा पूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडला गेला आहे.
रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान जाणाऱ्या वाहनचालकांना थेट मार्ग उपलब्ध होणार आहे. सध्या रेल्वे फाटक आणि पर्यायी मार्गांमुळे या परिसरात प्रवासासाठी बराच वेळ लागतो. नव्या पुलामुळे हा प्रवास सुमारे 30 मिनिटांवरून 10 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.
या पुलाचा फायदा केवळ विद्याविहारमधील नागरिकांनाच नव्हे, तर घाटकोपर, कुर्ला आणि आसपासच्या परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनाही होणार आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील विद्यमान उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यासही मदत मिळणार आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील उड्डाणपूल
पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणार मार्ग आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (GMLR) हा मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्वेकडील हॉटेल रत्नागिरी जंक्शन परिसरात सुमारे 1.26 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.
हा उड्डाणपूल जनरल अरुणकुमार वैद्य मार्गाला दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील संतोषनगर परिसराशी जोडतो. त्यामुळे दिंडोशी न्यायालय, हॉटेल रत्नागिरी जंक्शन आणि वालभट नदी चौक परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचा व्यापक उद्देश पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोडणे आहे. या मार्गावरील उड्डाणपूल आणि पुढील टप्प्यांत प्रस्तावित जुळे बोगदे पूर्ण झाल्यानंतर पूर्व-पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक सुलभ होऊ शकतो. मात्र, सध्या खुले होणाऱ्या उड्डाणपुलामुळे संपूर्ण गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता पूर्ण झालेला नाही.
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून किती दिलासा मिळणार?
मुंबईत वाहनांची वाढती संख्या, रेल्वे मार्गांमुळे निर्माण होणारे अडथळे आणि प्रमुख चौकांमधील कोंडी यांमुळे दररोज लाखो प्रवाशांचा वेळ खर्च होतो. अशा परिस्थितीत शीव, विद्याविहार आणि गोरेगाव येथील उड्डाणपूल खुले झाल्याने काही महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे.
