जेएनएन, मुंबई : 'सत्यमेव जयते फार्मर कप 2026' ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे 18 हजार शेतकरी गट पुढील काळात 50 लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वर्षा निवासस्थानी पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित ‘फार्मर कप 2026’च्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान उपस्थित होते. झूम लिंकद्वारे राज्यातील शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

यावेळी स्मार्ट शेती ॲपचे लोकार्पण करण्यात आले. कृषि विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी 26 ऑगस्ट 2025 पासून राज्यभरात 46 तालुक्यात सुरू असलेल्या फार्मर कपच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. 

मुख्यमंत्री म्हणाले की, या 'सत्यमेव जयते फार्मर कप 2026' या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वासच भविष्यातील कृषी परिवर्तनाचा पाया ठरेल.फार्मर कपमधील 18 हजार शेतकरी गट हे महाराष्ट्रातील शेती क्रांतीचे शिल्पकार ठरणार आहेत, त्यांच्या अनुभवातून लाखो शेतकरी प्रेरणा घेतील.   

सामूहिक प्रयत्नातून शेतीचे नियोजन - कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी मंत्री भरणे म्हणाले की, एकत्रितपणे शेती केल्यास आणि सामूहिक प्रयत्नातून शेतीचे नियोजन केल्यास उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांचे उत्पन्नही निश्चितपणे वाढू शकते. फार्मर कप उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या उमेद आणि आत्मविश्वासाचा संचार झाला आहे. विशेषतः स्वतःची जमीन नसतानाही एकत्र येऊन शेती करण्याचा निर्णय घेतलेल्या महिला गटांचे विशेष कौतुक आहे. 

    विकसित भारतासाठी शेतकऱ्यांच्या उन्नतीवर भर : आमिर खान

    अभिनेते आमिर खान म्हणाले की, "विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर सर्वप्रथम शेतकरी उन्नत आणि सक्षम होणे आवश्यक आहे. राज्यभरात फार्मर कपच्या माध्यमातून 18 हजारांहून अधिक शेतकरी गटांची निर्मिती झाली आहे.या संपूर्ण उपक्रमात मेंटर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जसा एक उत्तम शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो, त्याचप्रमाणे मार्गदर्शक शेतकरी गटांना योग्य दिशा देऊन त्यांच्या यशात मोलाची भूमिका बजावतील.हा उपक्रम डिजिटल आणि प्रत्यक्ष संपर्क यांचा प्रभावी संगम आहे. डिजिटल माध्यमातून अल्प खर्चात मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचता येते, तर प्रत्यक्ष संवादातून विश्वास आणि आत्मियता निर्माण होते. या दोन्हींच्या एकत्रित वापरामुळे हा प्रयोग अधिक प्रभावी ठरणार आहे.