मुंबई. भारतीय संविधान आणि लोकशाही व्यवस्थेच्या महत्त्वावर भर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान अस्तित्वात असेपर्यंत देशातील निर्णय संसदेच्या माध्यमातूनच होतील, असे स्पष्ट केले. तसेच, सत्तांतर हे निवडणुकीच्या माध्यमातूनच होत असते, असेही त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, लोकशाहीची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्व रुजविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ या उपक्रमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या दोन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांना भारतीय संविधान, मूलभूत हक्क, कर्तव्ये, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांची ओळख करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचीही उपस्थिती होती.
संविधानिक मूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख
‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली ‘स्मार्ट नागरिक’ पुस्तिका विद्यार्थ्यांमध्ये नागरिकशास्त्र आणि संविधानिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. संविधानातील मूलभूत तत्त्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये, लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व तसेच समाजाप्रती असलेली जबाबदारी विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यावर या पुस्तिकेत भर देण्यात आला आहे.
जोपर्यंत महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आहे, तोपर्यंत निर्णय संसदेतच घेतले जातील आणि ‘रेजिम’ केवळ निवडणुकीच्या माध्यमातूनच बदलेल! जब तक महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनका संविधान है, तब तक निर्णय संसद में ही होंगे और 'रेजिम' केवल चुनाव के माध्यम से बदलेगा! (स्मार्ट नागरिक' आणि 'विद्यार्थी प्रेरणा या पुस्तकांचे प्रकाशन | मुंबई | 16-10-2026) #Maharashtra #Mumbai #SmartNagrik
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2026
शालेय वयातच विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिकत्वाची जाणीव करून देणे, सार्वजनिक जीवनात शिस्त पाळणे, इतरांच्या अधिकारांचा आदर करणे आणि सामाजिक सलोखा जपणे, या बाबींना या उपक्रमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आचरणात उतरावीत, हा त्यामागील व्यापक हेतू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यातून प्रेरणा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘विद्यार्थी प्रेरणा’ ही दुसरी पुस्तिका विद्यार्थ्यांना शिक्षण, संघर्ष, समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्याय या मूल्यांची ओळख करून देणार आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाच्या बळावर प्रगती साधता येते, हा डॉ. आंबेडकर यांच्या जीवनप्रवासातील महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरावेत, तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि शिक्षणाविषयीची आवड वाढावी, हा या पुस्तिकेचा उद्देश आहे. संविधानिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यावरही भर देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची जाणीव रुजविण्याचा प्रयत्न
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता त्यांना सुजाण, कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील नागरिक म्हणून घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे, तसेच लोकशाही व्यवस्थेबद्दल आदर निर्माण करणे, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.
या पुस्तिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, या उपक्रमाचा प्रभावी परिणाम साधण्यासाठी पुस्तिकांमधील विषयांचे नियमित अध्यापन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
