जेएनएन, पुणे: कोरेगाव पार्क येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. या प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) यांचे नावं पुढे आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “माझ्याकडे जी माहिती आहे, त्यानुसार हा करार झाला होता आणि पैशाचे एक्स्चेंज बाकी होते. मात्र रजिस्ट्री पूर्ण झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी रजिस्ट्री रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे,” त्यामुळे व्यवहार रद्द झाला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

क्रिमिनल केस संपणार नाही

फडणवीस पुढे म्हणाले, “त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जो पैसा भरायचा लागतो, त्या संदर्भात नोटीस देण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई नियमानुसार केली जाईल. मात्र, या प्रक्रियेमुळे क्रिमिनल केस संपणार नाही. त्या प्रकरणातील ज्या अनियमितता झाले आहेत, त्यासाठी जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर कठोर कारवाई होईल.”

“यासोबतच या प्रकरणाची समांतर चौकशी ईसीएस (ECS) अंतर्गत सुरू आहे. ती चौकशी एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्या चौकशीतून या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे आणि अजून कोण कोण यामध्ये सहभागी आहे, हे स्पष्ट होईल. त्यानंतरच पुढील कारवाई ठरवली जाईल.”असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

या वक्तव्यामुळे कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणात पुढील काही दिवसांत मोठे राजकीय आणि प्रशासकीय बदल पाहायला मिळू शकतात. फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार, दोषींवर कारवाई टाळता येणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. 

ह्या प्रकरणात अजित पवार यांच्या मुलावर गंभीर आरोप झाले आहेत. त्यानंतर फडणवीस यांनी घेतलेली ही भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.