जेएनएन, नागपूर/संभाजीनगर. मराठवाडा, विदर्भ आणि धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील उभे पिके, घरे, रस्ते, पूलांचे प्रचंड नुकसान झाले आह. यामुळे  जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीने बाधित भागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित शेतकरी, नागरिक आणि स्थानिक प्रशासनाशी संवाद साधून त्यांनी मदतकार्याची गती वाढवण्याचे निर्देश दिले.

पावसामुळे नाल्यांना पूर आला असून अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ मदतीचे आश्वासन -

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले की, शेतकऱ्यांना तातडीची मदत पुरवली जाईल. नुकसानग्रस्त कुटुंबांना घरकुल आणि तातडीच्या जगण्याच्या गरजांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, सरकार लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कोणीही अडचणीत राहणार नाही. दरम्यान, इतरही काही मंत्री, आमदार आणि विरोधी पक्षाचे नेते बाधित भागांना भेट देत आहेत. त्यांनी सुद्धा शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत तातडीने मदतीची मागणी केली आहे.