जेएनएन, मुंबई. Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे मंगळवारी (22 एप्रिल) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. तसंच, राज्य सरकार या कुटुंबांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या गरजांवरही लक्ष केंद्रित करेल. पुण्यातील संतोष जगदाळे यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला, त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  

जगदाळे यांच्या मुलीला नोकरी

जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्यासाठी आपण कालच बोललो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देणार, असा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला.

या सहा जणांचा मृत्यू

    डोंबिवतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे कुटुंबियांसोबत एकत्र काश्मीर फिरायला गेले होते, त्यावेळी त्यांना दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या घातल्या. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हो दोघे मित्र त्यांच्या कुटुंबासह पहलगाम येथे गेले होते. त्यांनाही दहशतावाद्यांनी डोक्यात गोळी मारून ठार केलं. तर नवी मुंबईतील दिलीप देसले यांचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.