जेएनएन, मुंबई. Political News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा झटका दिला आहे. मुंबईचे माजी महापौर आणि उबाठाचे उपनेते दत्ता दळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. महायुती सत्तेत आल्यानंतर सरकारने मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले. ब्रिटीशांनंतर महायुती पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले गेले मात्र त्याआधी काहीजणांनी मुंबईची तिजोरी साफ केली, अशी घणाघाती टीका शिंदे यांनी आज केली.

मुंबई महापालिका काहीजण स्वत:ची जहागिरीदारी समजत होते. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरु केले. मुंबईकरांना हक्काची घरे, आरोग्य सुविधा देण्याचे काम सरकार करतेय. आतापर्यंत उबाठाचे 45 ते 50 नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मुंबई पालिकेतील विविध पक्षांच्या जवळपास 70 विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

दळवी यांच्यासह धारावी, विक्रोळी, कांजूर, भांडूप. मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख 500 हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने विक्रोळीत उबाठा गटाला खिंडार पडले. त्याचबरोबर मुरबाडमधील उबाठा तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, युवा सेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील 18 सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला. छत्रपती संभाजी नगरमधून ओबीसी महासंघाचे 22 जिल्हाध्यक्ष, हिंदुस्थान चित्रपट कामगार सेना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पिंटो यांच्यासह असंख्य ख्रिस्ती बांधवांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.