जेएनएन, मुंबई: अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना दिलेल्या क्लीन चिट प्रकरणी नवा वाद उफाळला आहे. एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या बहिणी यास्मिन वानखेडे यांनी या क्लीन चिटला न्यायालयात आव्हान दिले आहे.
यास्मिन वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, मानहानीच्या तक्रारीची चौकशी पोलिसांनी पक्षपातीपणे केली. तपासामध्ये आवश्यक पुरावे व साक्षीदारांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चौकशी अपूर्ण ठेवून मलिक यांना दिलेली क्लीन चिट अन्यायकारक आहे, असा दावा केला आहे.
यास्मिन यांच्या मते, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे होते. त्यामुळे या प्रकरणात काटेकोर चौकशी होणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी योग्य तपास न करता मलिक यांना दिलेला दिलासा न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे, असे याचिकेत नमूद केले आहे.
या याचिकेमुळे नवाब मलिक पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालय या याचिकेवर सुनावणी घेणार आहे.