जेएनएन, मुंबई: समाजमाध्यमांवर 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने'बाबत पोस्ट अपलोड करण्यात आली आहे, ही भ्रामक असल्याची माहिती महाराष्ट्र माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये मुलांना 4000 रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाअंतर्गत ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे, व्हायरल झालेल्या पोस्टमधील सर्व दावे हे खोटे ठरतात. व्हायरल नोटीसवर कोल्हापूरच्या इचलकरंजी येथील वेंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यांची स्वाक्षरी आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी हा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे, असं माहिती संचालनालयाकडून सांगण्यात आलं आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय केला आहे दावा
“इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना सूचना
1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा एक पालक निधन पावले आहेत आणि मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांतील दोन मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी 4000 रुपये दरमहा मिळणार आहेत. ही लाभ जास्तीत जास्त लोकांना ह्या
कागदपत्रे:
- बाळ आणि आई एकत्र (छायाचित्र)
- शिधापत्रिका
- आधार कार्ड (आई आणि मुलासाठी)
- शाळेचे ओळखपत्र/मुख्याध्यापकांकडून लिहिलेले पत्र
- वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा पुरावा (72000/75000)
फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट/जिल्हा परिषद अधिकारी यांच्याकडे जमा करावा.
टीप: जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थी ------- या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात.”

अशी माहिती असलेला हा फॉर्म सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही माहिती खोटी असून अशी कोणतीही शासनाची योजना सुरु नाही, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अशी माहिती दिली आहे.