जेएनएन, मुंबई: देशातील जीएसटी दरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले बदल म्हणजे सर्वसामान्य माणूस, महिला भगिनी आणि छोट्या दुकानदारांना मोठा दिलासा देणारे निर्णय असून मोदींचा हा खरा मास्टर स्ट्रोक असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
GST दरांमध्ये केलेल्या बदलामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठे बदल होणार असून त्यामुळे लोकांच्या बचतीत वाढ आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे बदल म्हणजे देशवासीयांना दिवाळीपूर्वी दिलेली मोठी भेट असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर हे बदल लागू होणार असल्याने देशात ही ' महासत्तेची घटस्थापना ' असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
देशातील वेगवेगळ्या करामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी देशात जीएसटी अस्तित्वात आला. सुरुवातीला 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के 28 टक्के असे चार स्तरात तो आकारला जात होता. मात्र आता सर्व उत्पादनासाठी 5 आणि 18 टक्के असे दोनच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे देशवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या टेरीफला 'मेक इन इंडिया' द्वारे प्रत्युत्तर देण्यासाठी देशवासीयांना बळ मिळणार आहे. हा निर्णय देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारा असून या निर्णयांचे स्वागत करून शिंदे यांनी योग्यवेळी हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
राहुल गांधी यांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करून जीएसटी बदलांची माहिती दिल्यानंतर जीएसटीला 'गब्बर सिंह टॅक्स' म्हणत त्याची हेटाळणी करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवीन जीएसटी टॅक्स म्हणजे 'गृहस्थी सर्वनाश टॅक्स' असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी काँग्रेस कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चागल्या निर्णयांवर टीका करत असते, मात्र हा नवीन जीएसटी टॅक्स म्हणजे ' ग्रोथ सक्सेस टॅक्स' आणि सर्वसामान्य माणसासाठी' गृहस्थी सेव्हिंग टॅक्स ' असल्याचे सांगितले आहे. तसेच आज जाहीर झालेले निर्णय हे ' 21 वी सदी म्हणजे नरेंद्र मोदी ' हे समीकरण अधिक बळकट करणारे असून आगामी काळात त्याचा प्रत्यय विरोधकांना आल्याशिवाय राहणार नाही असे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.