मुंबई. Mahaparinirvan Din 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध मार्गांवर अनारक्षित विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर आणि अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते मुंबई  दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई -नागपूर, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-अमरावतीसह 13 विशेष एक्सप्रेस चालवणार आहे.

विशेष गाडी क्रमांक 01266 नागपूर येथून 5 डिसेंबर रोजी 18.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 10.55 वाजता पोहोचेल. या गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापुर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबा राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर एकेरी विशेष गाड्या देखील धावणार आहेत. ही विशेष गाडी क्रमांक 01249 मुंबई येथून 6 डिसेंबर रोजी 20.50 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी 11.20 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01253 दादर येथून 7 डिसेंबर रोजी 00.40 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 16.10 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01251 मुंबई येथून 7 डिसेंबर रोजी 10.30 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

 दक्षिण-मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाकडून आदिलाबाद ते दादर दरम्यान एक विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी नांदेड, छत्रपती संभाजीनगर या मार्गे धावणार आहे.

5 डिसेंबर रोजी गाडी संख्या 07129 ही गाडी आदिलाबाद येथून सकाळी ७ वाजता सुटणार असून, नांदेडला ही गाडी 10:45 वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर ही गाडी पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड व कल्याणमार्गे शनिवारी पहाटे 3:30 वाजता दादर येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ७ डिसेंबर रोजी गाडी संख्या 07130 ही गाडी दादर येथून मध्यरात्री 1:05 वाजता सुटेल आणि उपरोक्त मार्गाने सायंकाळी 6:45 वाजता आदिलाबाद येथे पोहोचेल.