मुंबई. मुंबईच्या मध्यवर्ती भागातील प्रभादेवी-एलफिन्स्टन परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला जुना रेल्वे उड्डाणपूल आता इतिहासजमा झाला आहे. तब्बल 112 वर्षे मुंबईच्या वाहतुकीचा भार वाहिल्यानंतर ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन रेल्वे उड्डाणपूल पाडण्यात आला आहे. आता त्याच ठिकाणी आधुनिक डबलडेकर रोड ओव्हर ब्रिज उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उदिष्ट महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात महारेलने ठेवले आहे.

रेल्वे मार्गांवरून जाणार नवा पूल

प्रभादेवीतील हा पूल वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याचे प्रमुख कारण म्हणजे तो पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गिकांवरून जाणार आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम करताना रेल्वे वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा, यासाठी विशेष रेल्वे ब्लॉक्स घेऊन गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.

महारेलने कामाचा वेग वाढवण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून आणखी 39 ब्लॉक्स घेण्याचे नियोजन केले आहे. या कालावधीत महाकाय स्टील गर्डर्स रेल्वे मार्गांवर बसवले जाणार आहेत. त्यामुळे काही काळ लोकल तसेच मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

दोन मजले, चार लेनची वाहतूक

नव्या पुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची डबलडेकर पुलावर वाहतुकीसाठी दोन स्वतंत्र स्तर असणार आहे. खालचा डेक प्रभादेवी, परळ आणि परिसरातील स्थानिक पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे. या डेकवर 2+2 अशा चार लेन असतील.तर वरचा डेक वरळी-शिवडी उन्नत मार्गाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. या डेकवरून वेगवान वाहतूक पुढे नेण्यात येणार असून, हा मार्ग मोठ्या वाहतूक कॉरिडॉरशी जोडला जाणार आहे. उपलब्ध प्रकल्प माहितीनुसार वरच्या डेकवरही 2+2 अशा चार लेनची तरतूद करण्यात आली आहे. 

    वरळी-शिवडी कनेक्टरला मिळणार मोठी कनेक्टिव्हिटी

    हा पूल केवळ प्रभादेवीतील वाहतूक कोंडी सोडवणारा पूल नसून वरळी-शिवडी उन्नत मार्गाचा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत या पुलाची भूमिका मोठी असणार आहे.

    या कॉरिडोरमुळे पश्चिमेकडील वरळी परिसरातून शिवडी आणि पुढे पूर्वेकडील महत्त्वाच्या मार्गांशी संपर्क अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. परिणामी सी-लिंक, वरळी परिसर, शिवडी आणि अटल सेतूच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला पर्यायी आणि अधिक वेगवान मार्ग उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 

    112 वर्षांचा इतिहास संपला

    प्रभादेवीचा जुना एलफिन्स्टन पूल हा मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होता. सुमारे 112 वर्षे जुना हा ब्रिटिशकालीन पूल कालांतराने मुंबईच्या वाढत्या वाहतुकीसाठी अपुरा ठरत होता. त्यामुळे नवीन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जुन्या पुलाचे टप्प्याटप्प्याने पाडकाम करण्यात आले.पुलावरील वाहतूक बंद करून रेल्वे मार्गांवरील गर्डर काढण्यासाठी रात्रीच्या विशेष ब्लॉक्सचा वापर करण्यात आला. अखेर नियोजनबद्ध पद्धतीने पुलाचे पाडकाम पूर्ण करण्यात आले. 

    चार मोठे स्टील स्पॅन

    नव्या पुलाच्या उभारणीसाठी मोठ्या आकाराचे स्टील स्ट्रक्चर आणि गर्डर्स वापरले जाणार आहेत. रेल्वे मार्गांवरील काम अत्यंत संवेदनशील असल्याने गर्डर लॉन्चिंगचे काम रेल्वे ब्लॉक्समध्ये केले जाणार आहे.

    महारेलने त्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेकडे सविस्तर ब्लॉक शेड्यूल पाठवले आहे. रेल्वे वाहतूक सुरू असताना पुलाचे हे काम करणे शक्य नसल्याने रात्रीच्या आणि नियोजित ब्लॉक्समध्ये महत्त्वाचे स्ट्रक्चरल काम पूर्ण केले जाणार आहे. 

    ‘ओपन वेब गर्डर’ तंत्रज्ञानाचा वापर

    या नव्या पुलाच्या रचनेत आधुनिक ओपन वेब गर्डर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारची रचना मजबूत आणि टिकाऊ मानली जाते. रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात खांब उभारण्याची गरज कमी करण्याच्या दृष्टीनेही अशा प्रकारची रचना उपयुक्त ठरणार आहे. 

    सुमारे 167 कोटींचा प्रकल्प

    नव्या डबलडेकर पुलाच्या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 167.35 कोटी रुपये असल्याची माहिती उपलब्ध आहे. आवश्यक परवानग्या आणि रेल्वे ब्लॉक्सच्या नियोजनानंतर प्रकल्पाला वेग देण्यात आला आहे. 

    नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

    सध्या महारेलने या प्रकल्पासाठी नोव्हेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी पुढील काळात रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात ब्लॉक्स घेऊन गर्डर लॉन्चिंग आणि इतर महत्त्वाची कामे पूर्ण केली जाणार आहेत.