जेएनएन, मुंबई. शहरातील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रदूषणकारी बांधकामांविरोधात कारवाईचा वेग वाढवला आहे. बांधकामांच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.

ऑक्टोबर महिन्यात तब्बल 428 बांधकामांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या असून, त्यापैकी 44 बांधकामांना थेट काम थांबवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील नियमांच्या अंमलबजावणीबाबत महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकेने 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ही कारवाई केली. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावण्यामागे बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ हेही एक महत्त्वाचे कारण मानले जाते. बांधकामस्थळांवरून उडणारी धूळ परिसरातील हवेत मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने बांधकामस्थळांवरील प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांची तपासणी तीव्र केली आहे.

धूळ नियंत्रणासाठी 28 नियमांचे पालन बंधनकारक

महापालिकेने 2024 मध्ये बांधकाम आणि पाडकामाच्या ठिकाणी होणारे प्रदूषण रोखण्यासाठी 28 मुद्द्यांची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार प्रत्येक बांधकामस्थळी धूळ हवेत पसरणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. बांधकामाच्या ठिकाणी पाण्याचे स्प्रिंकलर, अँटी स्मॉग गन आणि फॉगिंग यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. तसेच बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना चारही बाजूंनी हिरव्या जाळ्या, ज्यूट किंवा ताडपत्रीचे संरक्षक आवरण लावणे बंधनकारक आहे.

70 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये किमान 35 फूट उंचीचे संरक्षक पत्रे लावण्याची अट आहे. याशिवाय बांधकामस्थळी एअर क्वालिटी मॉनिटरिंग सेन्सर बसवणे, बांधकाम साहित्याची चढ-उतार करताना धूळ उडू नये म्हणून पाण्याची फवारणी करणे, बांधकामाचा राडारोडा व्यवस्थित वाहून नेणे आणि वाहनांची चाके स्वच्छ करण्याची व्यवस्था करणे अशा उपाययोजनांचाही समावेश आहे. नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचीही तरतूद केली आहे.

    एन विभागात सर्वाधिक उल्लंघन; के-दक्षिणमध्ये सर्वाधिक कामबंदी

    महापालिकेने केलेल्या कारवाईत घाटकोपर परिसराचा समावेश असलेल्या एन विभागात सर्वाधिक 105 कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर टी विभागात 52, जी-दक्षिण विभागात 48 नोटिसा देण्यात आल्या आहेत. यावरून मुंबईच्या विविध भागांमध्ये बांधकामस्थळांवरील प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

    दुसरीकडे, काम थांबवण्याच्या नोटिसांमध्ये के-दक्षिण विभाग आघाडीवर असून येथे नऊ बांधकामांना काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर-मध्य विभागात आठ बांधकामांना अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.