मुंबई. BMC Corporators: बृहन्मुंबई महानगर पालिकामधील नगरसेवकांच्या मानधनवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका अमरीन अब्रहणी यांनी नगरसेवकांना दरमहा 1 लाख रुपये मानधन देण्याची मागणी करत महापौर रितू तावडे यांना पत्र पाठवले आहे.
सध्या नगरसेवकांना मिळणारे मानधन आणि भत्ते हे कामाच्या प्रमाणात अपुरे असल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. मुंबईसारख्या महागड्या शहरात जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांना सतत कार्यरत राहावे लागते, विविध भागांत भेटी, बैठका, तक्रारींचे निवारण यासाठी खर्च वाढतो. त्यामुळे सध्याचे मानधन वास्तवाशी सुसंगत नसल्याचे मत मांडण्यात आले आहे.
अमरीन अब्राहानी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, नगरसेवकांवर स्थानिक पातळीवरील विकासकामांची जबाबदारी मोठी असते. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करताना आर्थिक मर्यादा येऊ नयेत, यासाठी मानधन वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे दरमहा किमान 1 लाख रुपये वेतन निश्चित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रस्तावावर काही जणांनी नगरसेवकांच्या कामाचा व्याप लक्षात घेता वेतनवाढ योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे, तर काहींनी आर्थिक ताण आणि प्राधान्यक्रमांचा मुद्दा उपस्थित करत या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महापौर रितू तावडे यांच्याकडून या मागणीवर काय भूमिका घेतली जाते, तसेच प्रशासन आणि स्थायी समिती याबाबत काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या विषयावर लवकरच महापालिकेच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
