मुंबई. तब्बल 25 वर्षांनंतर मुंबई महापालिकेच्या सत्ताकारणात मोठा बदल झाला आणि भाजपाच्या रितू तावडे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. भाजपच्या तावडे या सध्या मुंबईच्या महापौर म्हणून कामकाज पाहत आहेत. मात्र आता मुंबईच्या राजकारणात आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपचा महापौर असलेल्या मुंबई महापालिकेत लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर विराजमान होण्याची शक्यता आहे.

या बदलामागे महायुतीमधील महापौरपदाच्या कालावधीच्या वाटपाचा फॉर्म्युला असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः याबाबत मोठा खुलासा केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबई महापौरपदाच्या कालावधीबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सव्वा वर्षांनी बदलणार मुंबईचा महापौर?

एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील महापौरपदाच्या वाटपावर महायुतीमध्ये चर्चा झाली आहे. पहिल्या सव्वा वर्षांसाठी भाजपकडे महापौरपद राहील, तर त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला महापौरपदाची संधी मिळेल, अशी राजकीय चर्चा आता सुरू झाली आहे.

शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पाच वर्षांपैकी सव्वा वर्षाच्या महापौरपदाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रितू तावडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचा नेता किंवा नेत्या मुंबईच्या महापौरपदी विराजमान होण्याची शक्यता अधिक मजबूत झाली आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष, तरीही सत्ता वाटपाचा निर्णय-

    2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला 89 जागा मिळाल्या, तर शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाले. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने दोन्ही पक्षांनी मुंबईच्या सत्तेत एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला. 

    महापौरपद भाजपकडे गेल्यानंतर उपमहापौरपद शिंदे यांच्या शिवसेनेकडे देण्यात आले. संजय घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. शिवसेनेकडून उपमहापौरपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातही टप्प्याटप्प्याने बदल करण्याचे नियोजन असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते.

    25 वर्षांची शिवसेनेची सत्ता संपली

    मुंबई महापालिकेवर 1997 पासून शिवसेनेचा प्रभाव राहिला होता. त्यामुळे तब्बल 25 वर्षांनंतर भाजपाच्या रितू तावडे महापौर झाल्याने मुंबईच्या राजकारणात ऐतिहासिक बदल झाला. भाजपच्या उमेदवार म्हणून रितू तावडे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली, तर महायुतीच्या सत्तासमीकरणात शिंदे यांच्या शिवसेनेला उपमहापौरपद देण्यात आले.

    मात्र, भाजपने महापौरपद पूर्ण पाच वर्षे स्वतःकडे ठेवण्याऐवजी महायुतीतील सहकारी शिंदे यांच्या शिवसेनेला ठरावीक कालावधीनंतर संधी देण्याचा फॉर्म्युला स्वीकारल्याची चर्चा आता शिंदे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा जोर धरू लागली आहे.

    शिंदेंच्या वक्तव्याला राजकीय महत्त्व

    मुंबई ही शिवसेनेच्या राजकारणाची पारंपरिक ताकद मानली जाते. त्यामुळे भाजपकडे सर्वाधिक जागा असल्या तरी शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईच्या सत्ताकारणात योग्य राजकीय वाटा देणे महायुतीसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.