जेएनएन, मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युती व जागावाटपावरची अंतिम उद्या होणार असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसैनिकांना महत्त्वाचं आवाहन करत, “काही जागांवर आपल्याला त्याग करावा लागू शकतो,” असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मुंबईतील बालेकिल्ल्यात मनसेला जागा?
माहितीनुसार, मुंबईतील ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातील 8 ते 9 सिटींग नगरसेवकांच्या जागा मनसेला सोडण्याची तयारी शिवसेनेकडून दाखवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही जागावाटपाची चर्चा अत्यंत संवेदनशील मतदारसंघांबाबत सुरू आहे.
ज्या मतदारसंघांतील एक-एक प्रभाग मनसेसाठी सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामध्ये
भायखळा
दादर
दिंडोशी
घाटकोपर
भांडुप
शिवडी
वरळी
वांद्रे पूर्व
या मतदारसंघांचा समावेश आहे. हे सर्व मतदारसंघ शिवसेनेसाठी पारंपरिकदृष्ट्या मजबूत मानले जातात. त्यामुळे येथे जागा सोडण्याचा निर्णय हा शिवसैनिकांसाठी भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकतो.
2017 च्या निकालांचा आधार
मनसेकडून जागावाटपात 2017 च्या महापालिका निवडणुकीतील कामगिरीचा आधार घेतला जात आहे. ज्या जागांवर मनसेने त्या वेळी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती, त्या जागांवर मनसे आग्रही असल्याची माहिती आहे. त्यामुळे युतीतील चर्चा केवळ संख्यात्मक नसून, मतांची टक्केवारी, स्थानिक प्रभाव आणि उमेदवारांची ताकद या निकषांवर सुरू आहेत.
मातोश्रीवर आज महत्त्वाची बैठक
ठाकरे गटाकडून मनसेसोबत युतीच्या चर्चेत सहभागी असलेले प्रमुख नेते आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकीत शिवसेनेची अंतिम भूमिका, कोणत्या जागांवर तडजोड करायची आणि स्थानिक पातळीवर असणाऱ्या नाराजीवर कसा तोडगा काढायचा, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
उद्या अंतिम बैठक?
माहितीनुसार, उद्या मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची अंतिम बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब होऊन युतीची औपचारिक घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे बंधूंची युती प्रत्यक्षात आल्यास मुंबईच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो. मराठी मतांचे ध्रुवीकरण, भाजपसाठी वाढणारे आव्हान आणि महापालिकेतील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलण्याची क्षमता या युतीत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
हेही वाचा: Local Body Election 2025 Results: मतमोजणीबाबत निवडणूक आयुक्तांनी दिले महत्त्वाचे निर्देश, …तर होणार कडक कारवाई
