मुंबई- Mumbai municipal elections 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास “मुंबईचं अदानिस्तान होईल,” असा घणाघाती टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. यावर भाजपकडूनही तितकाच आक्रमक पलटवार करण्यात आला असून, ठाकरेंचा महापौर झाला तर मुंबईचं पाकिस्तान होईल, अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेत बोलताना भाजपवर निशाणा साधला. मुंबईची संपत्ती काही ठराविक उद्योगपतींच्या घशात घालण्याचं कारस्थान सुरू आहे. भाजपची सत्ता आली तर मुंबई विकली जाईल आणि सामान्य मुंबईकर हद्दपार होईल, असा आरोप त्यांनी केला. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पांच्या नावाखाली शहराची लूट होईल, असा दावाही ठाकरे यांनी केला.
याच टीकेला उत्तर देताना भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानावर जोरदार टीका केली. “उद्धव ठाकरे भीतीचं राजकारण करत आहेत. त्यांच्या अपयशाचं खापर भाजपवर फोडण्याचा हा प्रयत्न आहे. जर ठाकरेंचा महापौर झाला तर मुंबईचं पाकिस्तान होईल, असं वातावरण तयार केलं जाईल, असा घणाघात साटम यांनी केला. भाजप सत्तेत आल्यास मुंबईत पारदर्शक कारभार आणि वेगवान विकास होईल, असा दावाही त्यांनी केला.
या परस्परविरोधी आणि आक्रमक वक्तव्यांमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अधिकच तापला आहे. दोन्ही बाजूंनी टोकाची भाषा वापरली जात असल्याने राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. विकास, भ्रष्टाचार, उद्योगपतींची गुंतवणूक आणि मुंबईकरांचा हक्क हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्हं आहेत.
आगामी दिवसांत प्रचारसभांमधून या आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी वाढण्याची शक्यता असून, मुंबईकर कोणाच्या भूमिकेला पसंती देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
