मुंबई.Maharashtra Civic Polls 2026: महापालिका निवडणुकीत यंदा केवळ पक्षीय संघर्ष नव्हे, तर पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरी हेच निर्णायक घटक ठरत असल्याचं चित्र आहे. अनेक प्रभागांमध्ये अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतल्याने पारंपरिक मतपेढ्या फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे अनेक वॉर्डमध्ये लढत अत्यंत अटीतटीची झाली आहे.
प्रभाग क्रमांक 2 -
मुंबई महानगरपालिका प्रभाग 2 मध्ये एकेकाळच्या मैत्रिणी असलेल्या तेजस्वी घोसाळकर विरुद्ध धनश्री कोलगे यांच्यात लढत होत आहे. तेजस्वी घोसाळकर या भाजपकडून तर धनश्री कोलगे या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत.
वॉर्ड क्रमांक 95
या वॉर्डमध्ये माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची थेट लढत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मनसे युतीचे उमेदवार हरी शास्त्री यांच्याशी होत आहे. बंडखोरीमुळे पारंपरिक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, निकाल शेवटच्या फेरीपर्यंत जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
प्रभाग क्रमांक 194
मुंबईतील अनेक लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या प्रभादेवीतील प्रभाग क्रमांक १९४ कडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रभागातील लढत अटीतटीची होणार असून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आणखी एक महालढत ठरणार आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे समाधान सरवणकर आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे निशिकांत शिंदे यांच्यात ही लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक 206 –
शिवडी: शिवडीतील हा वॉर्डही सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथे शिवसेना (उद्धव गट) चे सचिन पडवळ आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक नाना आंबोळे यांच्यात सामना आहे.
प्रभाग क्रमांक 226 (Cuffe Parade)
येथे मकरंद नार्वेकर विरोधात फक्त एक प्रमुख प्रतिद्वंद्वी आहे. तेजल पवार ही या वॉर्डमधून अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात आहे. ती स्वतःला युवा आणि शिक्षित उमेदवार म्हणून मांडत असून, पारंपरिक राजकीय पक्षांपेक्षा वेगळ्या शैलीने लढत देत आहे.
प्रभाग क्रमांक 109-
या वॉर्डमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक गणेश जाधव यांनी पक्षाला आव्हान देत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. महायुतीकडून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या राजश्री मांडवलीकर रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव गट) चे सुरेश शिंदे, काँग्रेसचे अजय पटेल आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे शहजादा मलिक अशी बहुरंगी लढत होत आहे. या प्रभागात मतांचे विभाजन निश्चित मानले जात असून, विजयाचे गणित अवघड बनले आहे.
प्रभाग क्रमांक 114
2012 मध्ये निवडून आलेल्या माजी नगरसेविका अनिशा माजगांवकर यांनी यंदा अपक्ष म्हणून बंडखोरी केली आहे. हा प्रभाग शिवसेना (उद्धव गट) ला सुटल्याने पक्षाकडून खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या वॉर्डमध्ये स्थानिक नेतृत्व विरुद्ध घराणेशाही असा भावनिक आणि राजकीय संघर्ष रंगताना दिसत आहे.
प्रभाग क्रमांक 159
शिवसेना (उद्धव गट) च्या उमेदवार व माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांच्यासमोर माजी नगरसेवक कमलाकर नाईक यांनी अपक्ष म्हणून थेट आव्हान उभं केलं आहे. या बंडखोरीमुळे शिवसैनिकांमध्ये दोन गट पडल्याचं चित्र असून, पारंपरिक मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक 177
भाजपचे माजी नगरसेवक नेहल शहा यांनी पक्षाविरोधात जात अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची थेट लढत महायुतीचे अधिकृत उमेदवार कल्पेश कोठारी यांच्याशी होत आहे. या वॉर्डमध्ये भाजपची पारंपरिक पकड मानली जात असली, तरी बंडखोरीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
प्रभाग क्रमांक 193
या वॉर्डमध्ये शिवसेना (उद्धव गट) च्या उमेदवार व माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्यासमोर शिवसेनेचे शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. स्थानिक संघटनात्मक ताकद असलेल्या कोळी यांच्या उमेदवारीमुळे ही लढतही अटीतटीची ठरण्याची चिन्हं आहेत.
प्रभाग क्रमांक 209
मुंबई महापालिकेसाठी प्रभाग 209 मध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाच्या यामिनी जाधव, मनसेच्या हसीना माहिमकर, हर्षला सुर्वे (राष्ट्रवादी काँग्रेस) राफिया दामोदी (काँग्रेस) यांच्यात लढत होत आहे. यामिनी जाधव यांना गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून, तर विधानसभा निवडणुकीत ठाकरेंचे आमदार मनोज जामसुतकर यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला आहे. 2019 मध्ये आमदारकी भूषवलेल्या यामिनी जाधव दोन निवडणुकात पराभूत झाल्यानंतर नगरसेविका होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
प्रभाग क्रमांक 225 –
कुलाबा: कुलाब्यातील हा वॉर्ड आधीच चर्चेत असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यामुळे तो गाजला आहे. शिवसेना (उद्धव गट) कडून अजिंक्य धात्रक, भाजपकडून हर्षिता नार्वेकर आणि शिंदे गटाकडून सुजाता सनप यांच्यात येथे तिरंगी लढत आहे.
