पुणे. PMC Election Big Fight : सत्ताधारी महायुतीतील फुटीमुळे पुण्याची महापालिका निवडणूक राज्यात कमालीची चुरशीची झाली आहे. यामध्य भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपने अनेक माजी नगरसेवकांना तिकीट नाकारून नवीन चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे. पुण्यातील अनेक प्रभागांमध्ये तुल्यबळ अशा आजी-माजींमध्ये रंगतदार लढती होत आहेत. या हाय व्होल्टेज लढतींच्या निकालाकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
पुणे महापालिकेसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस-शिवसेना-मनसे यांच्यात तीन आघाड्यात ही लढत होणार आहे. या सर्व पक्षांनी आपले मतब्बर नेते मैदानात उतरविले आहेत. मात्र सर्वाधिक लक्ष प्रभाग क्रमांक 23 कडे लागले आहे. येथे भाजपचे निवडणूकप्रमुख गणेश बिडकर यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर मैदानात उतरले आहेत. या दोघांमध्येच तुल्यबळ लढत होत आहे.
त्याचबरोबर भाजपमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले संदीप जऱ्हाड, अमोल बालवडकर, किरण बारटक्के, धनंजय जाधव तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले सचिन दोडके, सायली वांजळे, दिलीप बराटे व त्यांचा पुतण्या आदींच्या लढतींकडे विशेष लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे योगेश मुळीक व राष्ट्रवादीचे संदीप जहऱ्हाड यांच्यात लढत होत आहे. प्रभाग ७ मध्ये माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेशमा भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम निवडणूक रिंगणात उभे आहेत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे सनी निम्हण यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे प्रकाश ढोरे यांची लढत लक्षवेधी ठरणार आहे.
भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर अमोल बालवडकर राष्ट्रवादीकडून प्रभाग 9 मध्ये लढत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे लहू बालवडकर रिंगणात आहेत.
यांच्या उमेदवारीवरून भाजपने राष्ट्रवादीला घेरले -
आयुष कोमकर हत्या प्रकरणात कुख्यात गुंड बंडू आंदेकरची सून सोनाली आणि भावजय लक्ष्मी तुरुंगात असून दोघींनाही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्या प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने अनुराधा मंचे, ऋतुजा गडाळे यांना रिंगणात उतरवले आहे. सोनाली व लक्ष्मी यांच्या उमेदवारीवरून भाजपने राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत.
याच प्रभागातून म्हणजे 23 मधून माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे आणि भाजपचे गणेश कळमकर यांच्यातही लढत होत आहे. प्रभाग 10 मध्ये गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहे. त्यांच्याविरोधात भाजपच्या रूपाली पवार उभ्या आहेत. याच प्रभागातून भाजपचे दिलीप वेडे-पाटील राष्ट्रवादीच्या शंकर केमसे यांच्याविरोधात उभे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन मानकर प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवत आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे अजय मारणे उभे आहेत. प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्वसाधारण गटातून भाजपच्या निवेदिता एकबोटे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्याविरोधात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दीपक (बाळासाहेब) बोडके हे रिंगणात आहेत. प्रभाग 21 मध्ये भाजपच्या कोअर कमिटीचे प्रमुख सदस्य श्रीनाथ भिमाले निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर कॉंग्रेसचे नवखे उमेदवार अक्षय जैन निवडणूक लढवत आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे प्रभाग 13 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे सोनू निकाळजे उभे आहेत. तर, राष्ट्रवादीकडून विकार अहमद मुखतार शेख रिंगणात आहेत. प्रभाग २२ मधून माजी आमदार रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे, त्यांच्या पत्नी इंदिरा बागवे या निवडणूक रिंगणात आहेत.
प्रभाग 24 मधून सदानंद शेट्टी यांच्या पत्नी सुजाता ह्या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. त्यांच्याविरोधात भाजपच्या उज्ज्वला यादव ह्या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. प्रभाग 25 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे-पाटील यांच्याविरोधात भाजपच्या स्वप्नाली नितीन पंडित निवडणूक लढवत आहेत. याच प्रभागातून भाजपकडून राघवेंद्र मानकर, भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट निवडणूक रिंगणात आहेत. तसेच, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग 26 मधून भाजपचे अजय खेडकर आणि राष्ट्रवादीचे विजय ढेरे एकमेकांविरोधात उभे आहेत.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे पुन्हा एकदा महापालिकेच्या निवडणूक रिंगणात प्रभाग क्रमांक 27 मधून उभे असून, त्यांच्याविरोधात शिवसेना उबाठातून राष्ट्रवादीत गेलेले अशोक हरणावळ निवडणूक रिंगणात आहेत. याच प्रभागातून राष्ट्रवादीकडून धनंजय जाधवविरोधात भाजपचे अमर आवळे निवडणूक रिंगणात उभे आहेत.
प्रभाग 36 मधून भाजपचे महेश वाबळे यांच्याविरोधात कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेलेले माजी नगरसेवक आबा बागूल निवडणूक लढवत आहेत. याच प्रभागातून भाजपच्या विणा घोष ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष सुभाष जगताप यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. प्रभाग ३१ मधून पृथ्वीराज सुतार यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे हे निवडणूक रिंगणात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप यांच्याविरोधात भाजपचे अभिजित शिवरकर रिंगणात आहेत. या लढतीकडे देखील सर्व शहराचे लक्ष आहे.
पुण्यातील तुळ्यबळ लढती -
- रूपाली ठोंबरे-पाटील Vs स्वप्नाली नितीन पंडित
- गणेश बिडकर Vs प्रणव धंगेकर
- योगेश मुळीक Vs संदीप जहऱ्हाड
- रेशमा भोसले Vs नीलेश निकम
- सनी निम्हण Vs प्रकाश ढोरे
- अमोल बालवडकर Vs लहू बालवडकर
- सोनाली आंदेकर Vs अनुराधा मंचे
- लक्ष्मी आंदेकर Vs ऋतुजा गडाळे
- बाबूराव चांदेरे Vs गणेश कळमकर
- जयश्री मारणे Vs रूपाली पवार
- दिलीप वेडे-पाटील Vs शंकर केमसे
- हर्षवर्धन मानकर Vs अजय मारणे
- निवेदिता एकबोटे Vs दीपक (बाळासाहेब) बोडके
- श्रीनाथ भिमाले Vs अक्षय जैन
- अरविंद शिंदे Vs सोनू निकाळजे
- सुजाता शिंदे Vs उज्ज्वला यादव
- अजय खेडकर Vs विजय ढेरे
- धीरज घाटे Vs अशोक हरणावळ
- धनंजय जाधव Vs अमर आवळे
