जेएनएन, मुंबई. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 (Brihanmumbai Municipal Corporation Election 2025) साठी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीतील तारखेवरून समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांमध्ये होत असलेल्या आरोपांवर पालिकेने स्पष्ट भूमिका मांडली आहे. सर्व आरोप तथ्यहीन असून दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सुधारित वेळापत्रक जारी

महानगरपालिकेने दिलेल्या माहिती अनुसार, राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मूळ वेळापत्रकानुसार प्रारुप मतदार यादी 14 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. त्यावेळी आयोगाकडून पालिकेला प्राप्त झालेल्या प्रतींवरही हीच तारीख नमूद होती. मात्र, त्यानंतर आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले आणि प्रारुप मतदार यादी 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्याचे नवीन आदेश देण्यात आले.

प्रारुप मतदार यादी अधिकृतरीत्या प्रसिद्ध

सुधारित वेळापत्रकानुसार पालिकेने 20 नोव्हेंबर रोजीच प्रारुप मतदार यादी अधिकृतरीत्या प्रसिद्ध केली. याआधी ही यादी ना संकेतस्थळावर उपलब्ध होती, ना निवडणूक शाखेतून जनतेस वितरित करण्यात आली होती, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. प्रारुप यादीच्या प्रिंट प्रतींवर 14 नोव्हेंबरची तारीख कायम राहिली असली तरी ती फक्त आयोगाकडून पूर्वी प्राप्त झालेल्या दस्तऐवजांवर आधारित असल्याचे सांगितले आहे.

चुकीची माहिती प्रसारित करून संभ्रम निर्माण करू नये

    पालिकेच्या मते, या तारखेच्या उल्लेखावरून निर्माण झालेला गोंधळ हेतूपूर्वक वाढवून दाखवला जात असून त्याला कोणताही आधार नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसारच सर्व कामकाज झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान चुकीची माहिती प्रसारित करून संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.