जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील रुपाली चाकणकर यांनी अखेर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या वादामुळे त्यांच्यावर हा निर्णय घेण्याचा दबाव होता.
अशोक खरात प्रकरणामुळे वाढला दबाव
नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर चाकणकर अडचणीत सापडल्या आहेत. खरात यांना गुरु मानत असल्याच्या आरोपांमुळे त्यांच्यावर विरोधकांसह राष्ट्रवादीतील काही गटांकडूनही जोरदार टीका झाली. या पार्श्वभूमीवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत होती.
पक्षांतर्गत नाराजी उघड
या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेदही उघड झाले. काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत नेतृत्व बदलाची मागणी केली होती. त्यामुळे चाकणकरांवरील राजकीय दबाव आणखी वाढला.
निष्पक्ष चौकशीची मागणी
दरम्यान, राजीनामा देताना रुपाली चाकणकर यांनी या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. सत्य बाहेर यावं आणि न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचं नेतृत्व कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादळात रुपाली चाकणकर यांना दोन महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागला आहे.
