जेएनएन, मुंबई. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat) आता मोठी घडामोड समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना समन्स बजावले आहे. त्यांना याच आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणात काही महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीच्या एन्ट्रीमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
संशयास्पद मालमत्ता व्यवहारांची ईडीकडून चौकशी
माहितीनुसार, भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार, कथित मनी लॉन्ड्रिंग, देणग्या आणि काही संशयास्पद मालमत्ता व्यवहारांची चौकशी ईडीकडून केली जात आहे. या तपासादरम्यान काही आर्थिक व्यवहारांबाबत माहिती समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
ईडीचा स्वतंत्रपणे मनी लॉन्ड्रिंग अँगलने तपास सुरू
यापूर्वी राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. SIT कडून मागील काही दिवसांत अनेक व्यक्तींची चौकशी करण्यात आली असून काही आर्थिक कागदपत्रे आणि डिजिटल पुरावेही तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. SIT चौकशी सुरू असतानाच ईडीने स्वतंत्रपणे मनी लॉन्ड्रिंग अँगलने तपास सुरू केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या निकटवर्तीयांकडून या प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याचा दावा करण्यात येत आहे. चौकशी यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांकडून मांडली जात आहे. मात्र, ईडीच्या समन्सनंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका सुरू केली आहे.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात याआधीही अनेक धक्कादायक खुलासे समोर आले असून आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंध या मुद्द्यांवरून तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. आता ईडीच्या चौकशीतून आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
