जेएनएन, मुंबई: राज्यात आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. 17 नोव्हेंबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.
या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापयला सुरुवात झाली आहे.राज्यात सत्ताधारी महा यूती भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि विरोधी मविआ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस) या दोन्ही आघाड्यांमध्ये अद्याप युतीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतदान आणि मतमोजणी कार्यक्रम
मतदानाची तारीख : 2 डिसेंबर 2025
मतमोजणी : 3 डिसेंबर 2025
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया 18 नोव्हेंबरला होणार आहे, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर असेल. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल.
हेही वाचा: हवामानात झपाट्याने बदल; हिमालयातील बर्फवृष्टीचा महाराष्ट्रावर परिणाम, मुंबई 19 अंशांवर
