मुंबई. Anna Hazare Hospitalised: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीबाबत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. प्रकृती अचानक खालावल्याने अण्णा हजारे यांना राळेगणसिद्धी येथून मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

अण्णा हजारे यांच्यावर राळेगणसिद्धी परिसरातील एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील आणि अधिक प्रगत उपचारांसाठी मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना गंभीर व्हायरल संसर्ग आणि शरीरात पाण्याची मोठी कमतरता म्हणजेच अॅक्युट डिहायड्रेशन झाल्याची माहिती समोर आली आहे. 

ICU मध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार

मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर अण्णा हजारे यांना ICU मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉ. गौतम भन्साळी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती आहे. डॉक्टरांकडून त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात येत असून त्यानंतर पुढील उपचारांची दिशा निश्चित केली जाणार आहे.

अण्णा हजारे यांना व्हायरल संसर्ग आणि डिहायड्रेशनसोबत किडनीशी संबंधित समस्या असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, अण्णा हजारे यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत आणि सविस्तर वैद्यकीय माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत डॉक्टरांच्या निवेदनाची प्रतीक्षा आहे.

राळेगणसिद्धीत उपचार होते सुरू -

    गेल्या काही दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत होता. स्थानिक पातळीवर उपचार सुरू असतानाच प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत आणण्यात आले. त्यांना कार्डियाक अॅम्ब्युलन्समधून मुंबईतील रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती आहे.

    अण्णा हजारे यांच्या प्रकृतीकडे देशाचे लक्ष

    अण्णा हजारे हे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, ग्रामविकास आणि सामाजिक सुधारणांसाठी देशभर परिचित आहेत. 2011 मधील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलनामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख मिळाली होती. त्यांच्या आंदोलनामुळे देशात भ्रष्टाचारविरोधी जनमत तयार झाले होते.

    अलीकडेच NEET पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरही अण्णा हजारे यांनी भूमिका घेतली होती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले होते. तसेच हिंसेऐवजी लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवण्याची भूमिका त्यांनी मांडली होती.